भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने कामगारांची 50 कोटींची देणी थकवली, शेकडो सेवानिवृत्त कामगार 2 ऑक्टोबरपासून करणार उपोषण आंदोलन

तुटपुंज्या पगारावर राब राब राबलो. निवृत्त होताना अवघा 24 ते 26 हजार पगार घेतला. निवृत्तीनंतर कारखान्याकडून येणारी जी काही देणी आहेत त्यांवर आजारपण जाईल. गावाला घर बांधता येईल, अनेक इच्छा पूर्ण करता येतील अशी स्वप्ने पाहिली, परंतु सध्या 60 ते 70 वय असलेले तब्बल 500 कामगार त्यांच्या देण्यांसाठी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे उंबरे झिजवत असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या दौंड तालुक्यातील या साखर कारखान्याने सेवानिवृत्त कामगारांची तब्बल 50 कोटींची देणी थकवली आहेत. आधीच आजारपणाने अर्धे मेलोय, आणखी अंत पाहू नका,  कारखान्याकडून ठोस पाऊल उचलले गेले नाही तर येत्या 2 ऑक्टोबरपासून उपोषण आंदोलन करण्याचा इशारा या सेवानिवृत्त कामगारांनी दिला आहे.

भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार राहुल पुल यांच्याकडेही वारंवार पाठपुरावा केला, परंतु कामगारांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली, असा आरोप भीमा सहकारी साखर कामगार संघाचे माजी अध्यक्ष शिवाजी विठ्ठलराव काळे यांनी केला आहे. 2015 पासून थकीत देण्यांसाठी सेवानिवृत्त कामगार कारखान्याकडे पाठपुरावा करत आहेत. या कामगारांची संख्या अंदाजे 450 ते 500 आहे.

काय आहेत मागण्या?

थकीत पगार, ले ऑफमधील पगार, 15 टक्के आणि 12 टक्के त्रिपक्षीय वेतनवाढ पगार फरक, ग्रॅच्युईटीची रक्कम, रजेचा पगार, बोनस, प्रॉव्हिडंट फंड भरणा करणे, पगारातून कपात केलेली कामगारांची पतपेढीची कर्जवसुली आणि हप्तेवसुली, पगारातून इन्शुरन्स हप्ता वसूल केलेली रक्कम आणि इतर अनेक देणी अशा विविध मागण्या सेवानिवृत्त कामगारांच्या आहेत.

पेन्शनही नाही, जगायचे कसे?

सेवानिवृत्त कामगारांना वयोमानानुसार आजार जडले आहेत. त्यामुळे औषधपाण्यावर खर्च करायचा कसा, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. कारखान्याकडून थकीत देणी मिळाली तर निदान या कामगारांना त्या पैशांतून योग्य औषधोपचार घेता येतील आणि आयुष्य 5 ते 10 वर्षांनी वाढेल असे सेवानिवृत्त कामगारांनी म्हटले आहे. प्रॉव्हिडंट फंड न भरल्याने अंदाजे दोनशे लोकांना पेन्शनही सुरू झालेली नाही. ज्यांना पेन्शन मिळत आहे त्यांना केवळ हजार ते अडीच हजार रुपयेच मिळत आहेत. सध्याची महागाई पाहता या पैशांनी औषधोपचार करायचे कसे, असा सवाल शिवाजी काळे यांनी केला.