इस्रायलने केलेहिजबुल्लाहचे मुख्यालय जमीनदोस्त; बैरूतमध्ये स्फोटांचा प्रचंड धूमधडाका, हिजबुल्लाह प्रमुख नसरल्ला होता लक्ष्य

हिजबुल्लाचे बेरूतमधील मुख्यालय इस्रायलने शुक्रवारी अचूक हवाई हल्ला करत जमीनदोस्त केले. हिजबुल्लाप्रमुख हसन नसरल्ला या हल्ल्याचे लक्ष्य होता, असे इस्रायली चॅनेलनी म्हटले आहे. या हल्ल्यात 2 ठार आणि 76 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नेतन्याहू यांनी अमेरिका दौरा अर्धवट सोडून परतीची वाट धरली आहे.

दहीये या उपनगरीय भागातील या प्रचंड स्फोटानंतर केशरी-काळ्या धुरांच्या ढगांनी आकाश झाकोळून गेले होते. अनेक इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि बेरूतच्या उत्तरेला सुमारे 30 किमी अंतरावरील घरांना जोरदार हादरे बसले. सायरन वाजवत अनेक रुग्णवाहिकांनी हल्ल्याच्या ठिकाणी धाव घेतली. निवासी इमारतीच्या खाली हिजबुल्लाने मुख्यालय बनवले होते. इस्रायली हल्ल्यात आदल्या दिवशी मारल्या गेलेल्या हिजबुल्ला कमांडरचे अंत्यसंस्कार आटोपल्यावर तासाभराने हा हल्ला करण्यात आला. यामुळे या इमारतींत हिजबुल प्रमुख नसरल्ला असावा, अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे. हिजबुल्लाचे गेले 11 महिने सुरू असलेले हल्ले संपवण्याच्या निर्धाराने इस्रायलने या आठवडय़ात लेबनॉनमधील हवाई हल्ले अधिक तीव्र केले आहेत.