मॉलमधून चोरायचे महागडे कपडे

नामांकित मॉलमध्ये खरेदीच्या नावाखाली कपडे चोरणाऱ्या दोघांना साकीनाका पोलिसांनी अटक केली. अजय झोडगे आणि प्रशांत चव्हाण अशी त्याची नावे आहेत. ते चोरलेले कपडे अवघ्या 2 ते 3 हजारांत विक्री करायचे. त्या पैशातून ते दोघे मौजमजा करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

साकीनाका परिसरात एक मॉल आहे. त्या मॉलमधील कपड्याच्या स्टोअरमध्ये तक्रारदार हे मॅनेजर म्हणून काम करतात. ऑगस्ट महिन्यात ते कामाला आले. दुपारी दोन ग्राहक हे दुकानात आले. ते काहीही खरेदी न करता बाहेर पडले. तसेच रॅकवर ठेवलेले दोन शर्ट दिसत नसल्याचे सेल्समनने तक्रारदार यांना सांगितले. त्यामुळे त्याने दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

दुकानातील सेल्समन हा दोघांना जीन्स आणि शर्ट दाखवत असल्याचे एका फुटेजमध्ये दिसले. एक जण पॅन्टमध्ये काही तरी लपवून नेत असल्याचे फुटेजमध्ये कैद झाले. सात शर्ट आणि तीन जीन्स चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तक्रारदार याने साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक गबाजी चिमटे यांनी अधिकाऱ्यांना तपासाच्या सूचना दिल्या.

सहाय्यक निरीक्षक मैत्रानंद खंदारे आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी फुटेजची तपासणी केली. त्या फुटेजवरून पोलिसांनी नवी मुंबई येथे गेले. पोलिसांनी अजयच्या घराजवळ फिल्डिंग लावली. अजय घरी आल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत प्रशांतचे नाव समोर आल्यावर दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले.