गोंड गोवारी जमातीच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला, नागपुरात हजारो उतरले रस्त्यावर

गोंड गोवारी जमातीच्या आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा एकदा उचल खाल्ली आहे. नागपूरमध्ये आज गोंड गोवारी संवैधानिक हक्क कृती समितीतर्फे आरक्षणाच्या मागणीसाठी एक प्रचंड मोर्चा काढण्यात आला होता.

गोंड गोवारी जमातीला आदिवासीचे आरक्षण पुन्हा बहाल करण्यात यावे, त्यासाठी सरकारने नेमलेल्या के. एल. वडने समितीचा अहवाल लवकर जाहीर करण्यात यावा, या मागणीसाठी हा मोर्चा होता. यशवंत स्टेडियममधून निघालेला हा मोर्चा टेकडी रोडपर्यंत पोहचला. मोर्चासाठी ठेवलेल्या मोठ्या पोलीस फोर्सने हा मोर्चा अडवला.

गोंड गोवारी समाज आक्रमक

फेब्रुवारी महिन्यात गोंड गोवारी समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी नागपुरात अनेक दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. तेव्हा गोंड गोवारी समाजातील आंदोलकांनी चक्का जाम आंदोलन केले होते. आजच्या मोर्चातून चक्का जाम आंदोलन किंवा इतर प्रकारचे आंदोलन सुरू होणार नाही याची दक्षता घेत नागपूर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.