नाटेकर स्मृती बॅडमिंटन उद्यापासून

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटना आयोजित नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र आंतर-जिल्हा आणि खुल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धा उद्या रविवारपासून गोरेगाव स्पोर्टस् क्लब येथे खेळविली जाणार आहे. ही स्पर्धा 5 ऑक्टोबरपर्यंत रंगेल.

या स्पर्धेत पुरुष व महिला एकेरीत पुण्याच्या वरुण कुमार, साद धर्माधिकारीला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. पुरुष आणि महिला दुहेरीत बृहन्मुंबईच्या विप्लव व विराज कुवळे तसेच ठाण्याची मृण्मयी देशपांडे आणि कोल्हापूरची प्रेरणा आळवेकर जोडी अग्रमानांकित असेल. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा हिंदुस्थानची दुहेरीतील सर्वोत्तम जोडी चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी यांच्या हस्ते पार पडेल.

आंतरजिल्हा स्पर्धेसाठी पुरुष गटात नांदेड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, बृहन्मुंबई, रत्नागिरी, सांगली, अहिल्यानगर, पालघर, नागपूर, सोलापूर, सातारा, रायगड व हिंगोली तसेच महिला गटात जळगाव, संभाजीनगर, मुंबई उपनगर, नाशिक, पुणे, बृहन्मुंबई, रत्नागिरी, सांगली, अहिल्यानगर, नागपूर, सोलापूर, रायगड आणि ठाणे संघांचा समावेश आहे.