ब्राव्होने धोनी आणि चेन्नईची साथ सोडली

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने आधीच सर्व प्रकारच्या क्रिकेटला रामराम ठोकला होता, पण आता त्याने आयपीएलची सर्वात लोकप्रिय फ्रेंचायझी चेन्नई सुपर किंग्जचीही साथ सोडली आहे. तो गेली दोन मोसम चेन्नईसाठी गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत होता. मात्र यापुढे तो धोनी आणि चेन्नईसाठी ती भूमिका निभावणार नाही. कारण तो आता कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटॉर या नव्या भूमिकेत दिसेल. गौतम गंभीरने हिंदुस्थानच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. ती आता ब्राव्होला दिली जाणार आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला तारुबा येथे सेंट लुसिया किंग्ज विरुद्ध क्षेत्ररक्षण करताना मांडीच्या दुखापत झाली. दुखापतीमुळे ब्राव्होला कॅरेबियन प्रीमियर लीगच्या चालू मोसमातून माघार घ्यावी लागली. व्यावसायिक क्रिकेटर म्हणून एकवीस वर्षे ब्राव्हो मैदान गाजवत होता. मी माझे स्वप्न जगू शकलो. कारण मी प्रत्येक टप्प्यावर या खेळाला 100 टक्के दिले. मला हे नातं सुरू ठेवायला आवडेल, पण आता वास्तवाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

माझ्यासाठी हे योग्य व्यासपीठ आहे. कारण मी खेळण्यापासून पुढच्या पिढीच्या खेळाडूंना मार्गदर्शन आणि प्रशिक्षण देत आहे. मला खेळत राहावेसे वाटते, पण माझे शरीर आता साथ देत नाही. जड अंतःकरणाने मी अधिकृतपणे खेळातून निवृत्ती जाहीर करत आहे. आज, चॅम्पियन निरोप घेत आहे, असेही त्याने निवृत्तीच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

ब्राव्होने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, तर त्याने 2022 मध्ये आयपीएलमध्ये शेवटचा सामना खेळला होता. यानंतर तो चेन्नई सुपर किंग्ज आणि अफगाणिस्तान संघाशी प्रशिक्षक म्हणून जोडला गेला. ब्राव्होने 582 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 631 विकेट्स घेतल्या आहेत आणि जवळपास 7 हजार धावा केल्या आहेत.