सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेची बाजी! भाजप तोंडावर आपटली, आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली दणदणीत यश

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत  युवासेनेने भाजपला जोरदार दणका देत सर्वच्या सर्व दहा जागांवर दणदणीत विजय मिळवला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या शिलेदारांनी दमदार कामगिरी करीत खुल्या प्रवर्गातील पाच आणि राखीव प्रवर्गातील पाच अशा सर्व जागा जिंकत विजयी परंपरा कायम राखली. या निवडणुकीत युवासेनेचे प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अॅड. अल्पेश भोईर, परमात्मा यादव, किसन सावंत, शशिकांत झोरे, डॉ. धनराज कोहचाडे, शीतल शेठ-देवरूखकर, स्नेहा गवळी आणि मयूर पांचाळ निवडून आले. भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तोंडावर आपटली असून निवडणुकीतून पळ काढलेल्या मिंधे आणि मनसेच्या छुप्या पाठिंब्यानंतरही भाजपचा दारुण पराभव झाला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दहा पदवीधर नोंदणीकृत सिनेटची मुदत ऑगस्ट 2022मध्ये संपली. त्यामुळे ही मुदत संपण्याआधी निवडणूक घेऊन अधिसभा स्थापन होणे गरजेचे होते. मात्र राज्यात गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून सत्तेत आलेल्या मिंधे-भाजप सरकारने पराभवाच्या भीतीमुळे सिनेट निवडणूक घेण्याचे धाडस केले नाही. कारण याआधी झालेल्या सर्व निवडणुकांत मिंधे-भाजपला राज्यात सपाटून मार खावा लागला होता. विशेष म्हणजे दोन वर्षांनंतर 21 सप्टेंबर रोजी होणारी निवडणूकही विद्यापीठाने मिंध्यांच्या दबावामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने मिंधे आणि भाजपला चपराक लगावल्याने अखेर निवडणूक प्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतरही मिंधे-भाजपच्या आडून मतमोजणीलाही स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र राजकारणाने प्रेरित असणारी ही याचिकाही न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे आज विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील कॉन्व्हकेशन हॉलमध्ये ही मतमोजणी सुरळीतपणे पार पडली.

पुन्हा शतप्रतिशतयुवासेना

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत गेल्या अनेक वर्षांपासून युवासेनेचेच वर्चस्व राहिले आहे. ही निवडणूकही शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लढवण्यात आली. युवासेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावले जात असल्यामुळे सिनेट निवडणुकीतही युवासेनेलाच पदवीधरांचा पाठिंबा मिळत आहे. गेल्या निवडणुकीतही सर्व दहाच्या दहा जागा युवासेनेने जिंकल्या होत्या. तर या वर्षीही सर्व जागा जिंकत मुंबई विद्यापीठात ‘शतप्रतिशत’ युवासेना आली.

प्रदीप सावंत, शशिकांत झोरेंची हॅट्ट्रिक

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवासेनेचे प्रदीप सावंत हे सलग तिसऱ्यांदा भरघोस मताधिक्याने विजयी झाले आहेत. प्रदीप सावंत यांना पहिल्या पसंतीची 1338 आणि सर्वाधिक मते मिळाली. तर युवासेनेचे शशिकांत झोरे यांनीदेखील भरघोस मते घेत सलग तिसरा विजय मिळवत हॅट्ट्रिक केली.

नवे चेहरेदेखील चमकले

सिनेट निवडणुकीसाठी युवासेनेकडून खुल्या प्रवर्गातून अॅड. अल्पेश भोईर, परमात्मा यादव, किसन सावंत आणि राखीव प्रवर्गातून मयूर पांचाळ व स्नेहा गवळी यांना संधी दिली होती. मात्र युवासेनेच्या नव्या चेहऱ्यांनीही दमदार कामगिरी करीत पहिल्याच प्रयत्नात विजयी होत युवासेनेच्या ताकदीवर शिक्कामोर्तब केले.

भाजपचा सुपडा साफ

सिनेट निवडणुकीमध्ये पराभवाच्या भीतीने मिंधे आणि मनसेने निवडणुकीतून पळ काढला होता. मात्र भाजपप्रणीत संघटनेच्या उमेदवारांना छुपा पाठिंबा देण्याचे आदेशच मतदारांना देण्यात आले होते. यामुळे मनसेमध्ये इच्छुकांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळेच मनसेचे माजी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. तर भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला.

निवडणुकीचा निकाल

राखीव प्रवर्ग

डीटीएनटी

शशिकांत झोरे   युवासेना  5247 मते

अजिंक्य यादव अभाविप            1066 मते

एससी

शीतल देवरूखकर            युवासेना           5489 मते

राजेंद्र सायगावकर          अभिविप          1014 मते

एसटी

धनराज कोहचाडे             युवासेना           5247 मते

निशा सावरा      अभाविप            924 मते

ओबीसी

मयूर पांचाळ     युवासेना            5350 मते

राकेश भुजबळ   अभिविप           888 मते

महिला

स्नेहा गवळी      युवासेना            5914 मते

रेणुका ठाकूर      अभाविप            893 मते

खुला प्रवर्ग

प्रदीप सावंत      युवासेना            1338 मते

मिलिंद साटम    युवासेना            1246 मते

अॅड. अल्पेश भोईर          युवासेना           1137 मते

परमात्मा यादव युवासेना

किसन सावंत     युवासेना

खुल्या प्रवर्गात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पाच तर चार अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र युवासेनेच्या पाचही उमेदवारांनी पहिल्या पसंतीची मते आणि विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करीत दणदणीत विजय मिळवला.

ही तर सुरुवात आहे

ही तर सुरुवात आहे. असाच विजय महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत मिळवेल, असा विश्वास व्यक्त करत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सिनेट निवडणुकीतील युवासेनेच्या विजयी शिलेदारांचे अभिनंदन केले. सिनेट निवडणूक आणि निकालातही अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. हीच हरण्याची भीती असल्यामुळे मिंधे आणि भाजप राज्यातील पालिका आणि इतर स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहेत, असा निशाणा आदित्य ठाकरे यांनी साधला.