जगभरातील महत्वाच्या घडामोडी

1 ऑक्टोबरपासून कैलास पर्वत यात्रा

हिंदूंसाठी अत्यंत पवित्र अशी कैलास पर्वत दर्शन यात्रा येत्या 1 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यात्रेची घोषणा कुमाऊ मंडल विकास निगमने केली. याअंतर्गत भाविकांना पिथौरौगढ जिह्यातील ओल्ड लिपुलेखवर तयार करण्यात आलेल्या व्ह्यू पॉइंटवरून कैलास पर्वताचे अद्भुत दृश्य अनुभवता येईल. कैलास पर्वत दर्शन यात्रा 22 ते 55 वर्षे वयोगटातील भाविकांना करता येईल. यात्रेचा खर्च प्रतिव्यक्ती 80 हजार रुपये आहे.

एचआयव्हीचा संसर्ग घसरला

हिंदुस्थानात 2010 नंतर नवीन एचआयव्ही संसर्ग होण्याचा धोका कमी झाला असून यात 44 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी संयुक्त राष्ट्रामधील एका कार्यक्रमात बोलताना दिली. जागतिक स्तरांवर 39 टक्के घसरण झाली असताना हिंदुस्थानात मात्र 44 टक्के घसरण झाल्याचे अनुप्रिया पटेल यांनी म्हटले आहे.

कॅलिफोर्नियात मंदिराची तोडफोड

परदेशातील कॅनडा, अमेरिकेतील हिंदू मंदिरांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे. न्यूयॉर्क येथे झालेल्या मंदिरावरील हल्ल्यानंतर आता अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील सॅक्रामेंटो येथे बुधवारी रात्री बीएपीएस मंदिराला समाजकंटकांनी लक्ष्य केले. मंदिराच्या भिंतीवर ‘अमेरिकेतील हिंदूंनो परत जा’ असे संदेश लिहिलेले दिसून आले. मंदिर प्रांगणात तोडफोडही करण्यात आली.

ओपन एआयच्या सीईओचा राजीनामा

ओपनएआयच्या सीईओ मीरा मुराटी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्या 2017 पासून सीईओ म्हणून कार्यरत होत्या. मीरा मुराटी या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मोठे प्रोजेक्ट करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कंपनीत साडेसहा वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर मीरा यांनी कंपनीला एक पत्र लिहून आभार मानले आहे.

सैफ अली खान याने केले राहुल गांधींचे कौतुक

भूतकाळात वेळोवेळी झालेल्या अपमानाला, टीकेला तोंड देत परिस्थिती बदलणारे एक धाडसी राजकारणी म्हणून राहुल गांधी आपल्याला आवडतात, असे कौतुक अभिनेता सैफ अली खान याने केले आहे. टीकेचा प्रभावीपणे सामना कसा करायचा हे या निडर राजकीय नेत्याला माहीत आहे. मला असे धाडसी आणि प्रामाणिक राजकारणी आवडतात, असे सैफने इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये सांगितले. मला वाटते की, राहुल गांधींनी जे केले तेदेखील खूप छाप पाडणारे आहे. असा एक काळ होता जेव्हा ते सांगत वा करत असलेल्या गोष्टींचा लोक अनादर करायचे, पण अतिशय परिश्रमपूर्वक त्यांनी ही परिस्थिती बदलली आहे, असे सैफ याने सांगितले.

राजस्थानात पिंपरी पोलिसांच्या पथकावर आरोपीने गाडी घातली

सायबर गुह्यातील आरोपीला पकडण्यासाठी राजस्थानातील जयपूरमध्ये गेलेल्या पिंपरी-चिंचवडच्या सायबर सेल गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक स्वामी यांच्या अंगावर स्कॉर्पिओ मोटार घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि. 26) समोर आली आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. गाडीचा धक्का लागल्याने सहाय्यक निरीक्षकाला मुका मार लागला आहे. या प्रकरणी जयपूर येथील स्थानिक पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेडाम परिमंडळ-9 तर गावडे परिमंडळ-5च्या उपायुक्त पदी

मुंबई पोलीस दलातील उपायुक्तांच्या किरकोळ बदल्या करण्यात आल्या असून दीक्षितकुमार गेडाम यांच्याकडे परिमंडळ-9ची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील अंतर्गत उपायुक्तांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या. त्यानुसार परिमंडळ-8चे उपायुक्त गेडाम यांच्याकडे परिमंबडळ-9ची जबाबदारी सोपविण्यात आली. उपायुक्त गणेश गावडे हे परिमंडळ-5चे उपायुक्त असतील. तर परिमंडळ-8ची जबाबदारी मनिष कलवानिया यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच सहाय्यक आयुक्त शैलेश पासलवार यांच्याकडे घाटकोपर विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

ताडदेवमध्ये उद्या रक्तदान शिबीर

मुंबई सेंट्रल येथील गोपाळ कृष्ण क्रीडा मंडळाच्या वतीने येत्या रविवारी 29 सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सर जे.जे. महानगर रक्तपेढीच्या माध्यमातून हे शिबीर आयोजित केले आहे. ताडदेव येथील गोपाळ कृष्ण क्रीडा मंडळ नवरात्र उत्सव दरवर्षी साजरा करते. यंदा मंडळाचे 46वे वर्ष आहे. उत्सवाच्या अगोदर मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. या शिबिराला अनेक जण हजेरी लावतात. रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबीर गोकुळधाम सोसायटी ताडदेव येथे असणार आहे. अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष महंत बोले यांनी केले आहे. मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रमदेखील राबविले जातात.