चीनची आण्विक पाणबुडी समुद्रात बुडाली

चीनची आण्विक पाणबुडी वुहानजवळील वुचांग शिपयार्डमध्ये बुडाली आहे. बुडालेली पाणबुडी झाओ वर्गाची अणुऊर्जेवर चालणारी होती. ही घटना मे किंवा जून महिन्यात घडली असली तरी त्याची माहिती सॅटेलाईट इमेजद्वारे नुकतीच समोर आली आहे. अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनीही पाणबुडी बुडाल्याचा दावा केला आहे. मात्र, चीनने अद्याप या प्रकरणाला दुजोरा दिलेला नाही.

वॉशिंग्टनमधील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्याने या विषयावर भाष्य करण्यास नकार दिला. यासंबंधित कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. 10 मार्च रोजी, मॅक्सर टेक्नॉलॉजीजच्या एका उपग्रह प्रतिमेत झोउ-क्लास पाणबुडी वुहानजवळील शिपयार्डमध्ये डॉक केलेली दिसली होती.

अमेरिकेने डिवचले

चिनी उपकरणांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाताहेत, असे एका अमेरिकन संरक्षण अधिकाऱ्याने म्हटले. चीनचे संरक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराने बुडाले आहे. या घटनेमुळे चीनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याची टीका होत आहे. बीजिंगसाठी ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे, असे अन्य एका अमेरिकन अधिकाऱ्याने म्हटले.