सूचना का पाळल्या नाही? तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही उत्तर नाही; अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून निवडणूक आयोगाचा संताप, भाजप-मिंधे सरकारवर ताशेरे

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांसह केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत केंद्रीय निवडणूक आयोगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत राज्याच्या मुख्य सचिवांच्या भूमिकेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले आहेत. तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही कोणतीही कारवाई का केली नाही, असा सवाल आयोगाने केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत केलेल्या सूचनांचा अहवाल न दिल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रासह निवडणुका होणाऱ्या इतर 4 राज्यांच्या मुख्य सचिवांना केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्र लिहिले होते. एकाच जागी 3 वर्षांपेक्षा जास्त काळ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या सूचना या पात्रतून आयोगाने राज्यांना दिल्या होत्या. पण आयोगाच्या पत्राकडे राज्याच्या मुख्य सचिवांनी दुर्लक्ष केल्याने आयोगाने नाराजी व्यक्त केली.

राज्याच्या मुख्य सचिवांना दिलेल्या कालावधीत या सगळ्याची माहिती का दिली नाही? हे स्पष्ट करण्याचे निर्देशही केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले. तीन वेळा स्मरणपत्र पाठवूनही राज्य सरकारकडून कुठलही उत्तर न आल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने ताशेरे ओढले आहेत. एवढेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीदरम्यान मुंबईत मतदान केंद्रांवरील गैरसोयीबद्दलही केंद्रीय निवडणूक आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्याचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासोबत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग शनिवारी पत्रकार परिषद घेणार आहे.