विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र

विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणूक पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवा, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 24 सप्टेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांना पाठवलेल्या पत्राची प्रत आज पुन्हा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे सुपूर्द केली. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना हटवण्याची मागणी नाना पटोले यांनी केली.

यासंदर्भात टिळक भवनमध्ये नाना पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रश्मी शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असतानाही भाजप युती सरकारने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. त्या भाजप युती सरकारला अनुकुल अशी भूमिका घेऊन मदत करत असतात, असे वादग्रस्त व संशयास्पद अधिकारी निवडणूक काळात नसावेत, अन्यथा निवडणूक निःपक्षपातीपणे होणार नाही, अशी मागणी काँग्रेसने केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मंत्रालयात गृहमंत्र्यांच्या कार्यालयाची एका महिलेने तोडफोड केली व गृहमंत्र्यांच्या नावाच्या पाटीची तोडफोडही केली. राज्याचा गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला.