पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री करतात; केजरीवालांची मोदींवर घणाघाती टीका

दिल्ली विधानसभेत गुरुवारपासून अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत भाषण करताना दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. पंतप्रधान ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री बनवतात, असा जोरदार टोला केजरीवाल यांनी लगावला आहे.

अशी 25 ‘रत्ने’ पंतप्रधान मोदींची रत्ने आहेत, असेही केजरीवाल पुढे म्हणाले. पुढे तपास यंत्रणांच्या गैरवापराचा मुद्दा उपस्थित करत भाजपला लाज वाटते का? लाल किल्ल्यावर उभे राहून देशाला मूर्ख बनवताना लाज वाटत नाही का? असे सवालही केजरीवाल यांनी केले.

केजरीवाल म्हणाले, “मी चार-पाच दिवसांपूर्वी मोहन भागवत यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रात मी त्यांच्याशी पाच मुद्द्यांवर बोललो होतो. यातील एक मुद्दा म्हणजे पंतप्रधान मोदी ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून किंवा पैशाचे आमिष दाखवून देशातील सर्वात भ्रष्ट नेत्यांना त्यांच्या पक्षातून फोडून आपल्या पक्षात आहेत, याला ते (मोहन भागवत) सहमत आहेत का?”

अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आम्ही त्यांना तुरुंगात पाठवू, असे 27 जून 2023 रोजी पंतप्रधान म्हणाले. मग पाच दिवसांनंतर 2 जुलै रोजी अजित पवार यांचा त्यांच्याच सरकारमध्ये समावेश करण्यात आला. आणि त्यांना उपमुख्यमंत्री केले. मला त्यांना विचारायचे आहे की तुम्हाला काही लाज वाटते का? तुम्ही तुमच्या परिसरात आणि घरी जाताना कोणता चेहरा दाखवता? असे म्हणत केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.

मोदींच्या सरकारमधील भ्रष्ट नेत्यांचा पाढाच केजरीवाल यांनी वाचला. हिमंता बिस्वा सरमा, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ, यशवंत जाधव, संजय सेठ, के गीता, कृपा शंकर सिंह, अशोक चौहान, नवीन जिंदाल, तपस रे, अर्चना पाटील, गीता कोडा, बाबा सिद्दीकी, ज्योती मिंडा, सुझाना चौधरी अशी भाजपच्या गोटातील मंत्र्यांची यादीच केजरीवाल यांनी जाहीर केली.