मंत्रालयात गृहमंत्री फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर महिलेचा गोंधळ; नावाची पाटी फोडली, कुंड्यांचीही तोडफोड

राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बदलापूर, नागपूर, पुणे, मुंबई, ठाणेसह अनेक ठिकाणी अत्याचाराच्या हिडीस घटना समोर आल्या असून कायदा-सुव्यवस्था मोडकळीस आली आहे. एकीकडे एकामागोमाग एक घटना समोर येत असताना दुसरीकडे मंत्रालयही सुरक्षित नसल्याचे दिसतेय. गुरुवारी सायंकाळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका महिलेने धिंगाणा घातल्याचे वृत्त आहे. धक्कादाय म्हणजे ही महिला पास न काढताच मंत्रालयात घुसली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला सचिवांसाठी असलेल्या गेटमधून मंत्रालयात घुसली होती. त्यानंतर महिलेने आपला मोर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयाकडे वळवला. सदर महिलेने कार्यालयाबाहेर लावलेली फडणवीस यांच्या नावाची पाटी काढली आणि जोराने आपटली. त्यानंतर शोभेसाठी लावलेल्या कुंड्यांचीही तोडफोड केली. याचा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाचा 3200 कोटींचा महाघोटाळा; स्वच्छतेच्या नावाखाली सरकारी तिजोरीवर आरोग्यमंत्र्यांचा दरोडा!

मंत्रालयातील सहाव्या माळ्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यालय आहे. याच कार्यालयाबाहेर एक महिला गृहमंत्र्यांच्या नावाची पाटी तोडून आपला राग व्यक्त करतांना व्हिडीओत दिसत आहे. एकीकडे सरकारचे लाडक्या बहिणीचे इव्हेंट सुरू आहेत तर दुसरीकडे एक महिला मंत्रालयात येऊन संतापाने नावाची पाटी फोडत आहे. राज्यातील ही दोन चित्र खूप काही सांगून जात आहेत, असे ट्विट वडेट्टीवार यांनी केले.

सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही महिला पास न काढताच मंत्रालयात त्यांच्या दालनापर्यंत पोहोचली. मंत्रालयाची सुरक्षा करण्याची जबाबदारी गृहखात्याची आहे. हा भाग सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानला जातो. परंतु तरीही येथील सुरक्षाव्यवस्था एवढी ढिसाळ कशी असू शकते? गृहमंत्र्यांना आपल्या दालनाची सुरक्षा करता येत नसेल तर ते राज्यातील जनतेचे संरक्षण कसे करतील हा प्रश्न आहे, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.