हातात रिवॉल्वर घेऊन पोस्टर लावले म्हणून कुणी ‘अभिमन्यू’ होत नाही, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी स्वत:चा उल्लेख आधुनिक अभिमन्यू असा केला होता. मी आधुनिक अभिमन्यू असून चक्रव्यूह तोडणार असे ते म्हणाले होते. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हातात रिवॉल्वर घेऊन पोस्टर लावले म्हणून कुणी ‘अभिमन्यू’ होत नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांना देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाबाबत विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, चक्रव्यूहात योद्धे अडकतात, बेईमान नाही. फडणवीस यांनी महाभारताचा इतिहास समजून घ्यायला हवा. अभिमन्यूचा इतिहास, युद्धकौशल्य वादातीत होते. त्यामुळे फडणवीस यांनी स्वत:ची तुलना अभिमन्यूशी करू नये.

अभिमन्यू खरोखर योद्धा होता. तो प्रामाणिक होता. त्याला स्वत:चा विचार आणि भूमिका होती. पण असे काही फडणवीस यांच्यात दिसते का? फक्त हातामध्ये खोटे रिवॉव्हर घेऊन सिंघमसारखे पोस्टर लावले की कुणी अभिमन्यू होत नाही, असा टोला राऊत यांनी लगावला.

औरंगजेबाप्रमाणे अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले तरी भाजप-महायुतीचा विजय होणार नाही! – संजय राऊत

एन्काऊंटर करणार का?

कोरेगाव पार्क येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. हे स्वत:ला सिंघम समजणारे त्यांचे एन्काऊंटर करणार का? नालासोपाऱ्यात भाजपच्या पदाधिकाऱ्याने बलात्कार केला. मिस्टर सिंघम त्याचे एन्काऊंटर करणार का? असा सवाल करत राऊत म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी किंवा कुणाला तरी वाचवण्यासाठी एन्काऊंटर करणाऱ्यांनी स्वत:ला योद्धा किंवा अभिमन्यू समजू नये. हा संपूर्ण महाभारताचा अपमान ठरेल.

मिंधे-अजितदादांना भाजपचे मतदान झालं!

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना झालेले मतदान भाजपचे आहे. शिंदेंकडे स्वत:चे एक टक्काही मतदान नाही. अजित पवारांकडेही स्वत:चे मतदान असते तर बारामतीत त्यांच्या पत्नी पराभूत झाल्या नसत्या. आधीचे आकडे बघितले तर बारामतीमध्ये भाजपला जेवढे मतदान व्हायचे तेवढेच सुनेत्रा पवार यांना झाले. याचाच अर्थ शिंदे, अजितदादांना झालेले मतदान भाजपचे आहे, असे राऊत म्हणाले.

अजित पवारांचा खेळ संपलेला आहे

ते पुढे म्हणाले की, 2024 च्या निवडणुकीनंतर शिंदे मुख्यमंत्रीपदावर दिसणार नाहीत. भाजपही कधीच शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही. अजित पवारांचा तर खेळ संपलेला आहे. शिंदेंना आम्ही नेता का मानायचे असे भाजपच्या कोअर कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना पडलेला प्रश्न आहे. फडणवीस तोंडावर कितीही दाखवत असतील पण मनातील खदखद आम्हाला माहिती आहे, असेही राऊत म्हणाले.