अडल्ट स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी; उल्हासनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

उल्हासनगर पोलिसांनी अडल्ट स्टार रिया बर्डे हिला अटक केली आहे. हिंदुस्थानी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये रियाला आरोही बर्डे उर्फ बन्ना शेख नावाने ओळखले जाते. रियावर खोट्या कागदपत्रांच्या मदतीने हिंदुस्थानमध्ये वास्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला असून याच प्रकरणात तिला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

रिया बर्डे हिच्यावर भादवी कलम 420, 465, 468, 479, 30 आणि 14 ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिया मूळची बांगलादेशची असून तिची आई, भाऊ आणि बहीण खोट्या कागदपत्रांच्या मदतीने हिंदुस्थानमध्ये बेकायदेशीरपणे रहात असल्याचा आरोप तिच्यावर आहे. विशेष म्हणजे बांगलादेशी असतानाही खोट्या कागदपत्रांच्या मदतीने रियाच्या आईने अमरावतीतील एका व्यक्तीशी लग्नही केले होते.

पोलिसांनी रिया व्यतिरिक्त तिची आई अंजली बर्डे उर्फ रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रविंद्र उर्फ रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ मोनी शेख यांनाही या प्रकरणात सहआरोपी बनवले आहे. रियाच्या अटकेनंतर पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, ती अनेक प्रोडक्शन हाऊससोबत काम करत असून तिने अडल्ट चित्रपटातही काम केले आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी संग्राम मालकर यांनी सांगितले की, रियाची आई अंजली बांगलादेशची रहिवासी असून दोन मुली आणि मुलासह हिंदुस्थानमध्ये बेकायदेशीरपणे रहात आहे. अंजली उर्फ रुबी शेख आपण पश्चिम बंगालची असल्याचा दावा करते आणि तिने अमरावती येथील अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केले. त्यानंतर स्वत:सह मुलांचा खोटा जन्मदाखला आणि अन्य कागदपत्र बनवली. त्याच्या मदतीने तिने पासपोर्टही बनवला.

दरम्यान, रियाची आई आणि तिचे वडील हे दोघेही सध्या कतारमध्ये आहेत. तर तिच्या भावंडांचा पोलीस शोध घेत आहेत. याआधी रियाला मुंबई पोलिसांनी देहविक्री प्रकरणात अटक केली होती. रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती बांगलादेशी असल्याचे कळल्यावर त्याने पोलिसात तक्रार केली आणि संपूर्ण प्रकरण समोर आले.