900 कुकी हिंसाचार घडवणार असल्याबद्दल पुरावा नाही; मणिपूर सरकारने दावा घेतला मागे

मणिपूरमध्ये गेल्या दीड वर्षांपासून तणाव कायम आहे. आतापर्यंत घडलेल्या हिंसाचारामुळे आणि अजूनही मणिपूर जळत असल्याने राज्यात दहशतीचे वातावरण आहे. म्यानमारमधून मणिपूरमध्ये घुसखोरी केलेले तब्बल 900 कुकी बंडखोर 28 सप्टेंबर रोजी इंफाळ खोऱ्यातील विविध गावांमध्ये हिंसाचार घडवण्याच्या तयारीत असल्याचा दावा मणिपूर सरकारने बुधवारी केला होता, परंतु आता सरकारने हा दावा मागे घेतला असून याप्रकरणी ठोस पुरावा किंवा निश्चित माहिती अद्याप मिळाली नसल्याचे म्हटले आहे.

कुकी या सशस्त्र आणि प्रशिक्षित दहशतवाद्यांद्वारे 28 सप्टेंबर इंफाळमध्ये हिंसाचार घडवणार असल्याची माहिती हाती लागल्याचे सरकारने म्हटले होते, परंतु सरकारने आपला दावा आता मागे घेतला आहे. सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंह आणि डीजीपी राजीव सिंह यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली. तब्बल 900 कुकी बंडखोर मणिपूरमध्ये घुसले आहेत आणि ते 28 सप्टेंबर रोजी मैतेई समाजातील नागरिकांवर हल्ला करणार असल्याची माहिती मिळाली होती. परंतु, ही माहिती खरी असल्याचा कुठलाही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे सध्याच्या घडीला अशा माहितीवर विश्वास करण्याचे काहीच कारण नसल्याचे कुलदीप सिंह यांनी सांगितले.