राज्य उलथण्याच्या भीतीने मिंध्यांची टरकली; छत्रपती संभाजीनगरात आणीबाणी!

आणीबाणीवरून ऊठसूठ प्रवचने झोडणाऱ्या भाजप तसेच मिंधे सरकारची राज्य उलथण्याच्या भीतीने चांगलीच टरकली आहे. त्यामुळेच छत्रपती संभाजीनगरात चक्क आणीबाणीच लावण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात धरणे, उपोषणे, मोर्चे, निदर्शनांना बंदी घालण्यात आली आहे. एवढेच काय, शहरवासी क्षेपणास्त्र चालवण्याच्या भीतीने गृहखात्याला ग्रासले असून क्षेपणास्त्र सोडण्याची वा फेकण्याची साधने बाळगू नये, असे फर्मान सोडण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारची गाणी म्हणण्यास मनाई करण्यात आली असून आवेशपूर्ण भाषणही करता येणार नाही.

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जाहीर पत्रक काढून ही माहिती देण्यात आली आहे. 26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात शहरात आणीबाणीच लावण्यात आली आहे. लोकशाहीमध्ये आपल्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन करणे हा मूलभूत अधिकार मानला गेला आहे. मात्र या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. धरणे, उपोषण, निदर्शने, मोर्चावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीची प्रतिमा अथवा प्रेते किंवा आकृत्या यांचे प्रदर्शन करता येणार नाही.

दगड, गावठी बंदूक बाळगता येणार नाही आणीबाणीच्या काळात शारीरिक इजा होईल अशा वस्तू जवळ बाळगता येणार नाहीत. यात सोटा, भाले, दंडे, बंदुका, बरच्या, लाठ्या, काठ्यांचा समावेश आहे. लोखंडी अथवा स्टीलच्या धातूने बनवलेले पाईप, दुचाकीच्या सायलेन्सरचा वापर करून गावठी पद्धतीने सुतळी बॉम्ब फोडण्यासाठी बनवण्यात आलेल्या बंदुकांचाही वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. दाहक अथवा स्फोटक पदार्थही जवळ बाळगता येणार नाहीत.

क्षेपणास्त्र वापराची भीती

आणीबाणीच्या काळात क्षेपणास्त्र वापरण्यासही मनाई करण्यात आली आहे. कोणत्या प्रकारचे क्षेपणास्त्र याचा उल्लेख पोलिसांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात केलेला नाही. मात्र क्षेपणास्त्र सोडण्याची वा फेकावयाची साधने जवळ बाळगता येणार नाहीत किंवा ती जमा करता येणार नाहीत. क्षेपणास्त्र तयारही करता येणार नाहीत.

घोषणा बंद, गाणे बंद

राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल, राज्य उलथवून टाकण्याची भाषा वापरणारी भाषणे करता येणार नाहीत. आवेशपूर्ण भाषणे करू नयेत, सोंग वा हावभावही करता येणार नाहीत. जाहीर घोषणाही या आणीबाणीत देता येणार नाहीत. त्याचबरोबर गाणेही म्हणता येणार नाही. समाजाची सभ्यता वा नीतिमत्तेस धक्का पोहचेल असे काहीही या आणीबाणीच्या काळात करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणारांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

■ धरणे, उपोषण, मोर्चे, निदर्शनांना बंदी
■ सुतळी बॉम्ब फोडण्याच्या बंदुकीस मनाई
■ क्षेपणास्त्रे सोडण्याची साधने बाळगता येणार नाहीत
■ व्यक्तीच्या प्रतिमा, प्रेते, आकृत्यांचे प्रदर्शन बंद
■ कोणत्याही प्रकारची गाणी म्हणता येणार नाहीत
■ आवेशपूर्ण भाषण, हावभाव करता येणार नाहीत
■ आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई