असा बिनकामाचा मुख्यमंत्री देशाने कधी पाहिला नसेल, मुंबईकरांच्या पाऊसकोंडीवरून आदित्य ठाकरे मिंध्यांवर बरसले

परतीच्या पावसात मिंध्यांचे दावे अक्षरशः वाहून गेले. 2005 नंतर पहिल्यांदाच वेस्टर्न एक्प्रेस वेवर पाणी भरले. रेल्वे ठप्प झाली. आपत्कालीन स्थितीसाठी आमच्या काळात सुरू केलेले पालिकेचे ट्विटर बंद पडले. मेट्रोने जागोजागी खोदकाम करून बॅरिकेड्स लावल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबले, वाहतूक रखडली. मुंबई-ठाण्यासह पुण्यातही पूर आला. प्रशासकाच्या माध्यमातून कंत्राटदारांसाठी काम करणाऱया अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. असा अकार्यक्षम मुख्यमंत्री देशाने आतापर्यंत पाहिला नाही, असा टोला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लगावला. मिंध्यांच्या राज्यात केवळ कॉन्ट्रक्टरची मजा असून स्वतःला खोके आणि जनतेला धोके, असा प्रकार सुरू असल्याचा घणाघातही त्यांनी केला.

मुंबईत बुधवारी परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. मात्र सरकार आणि पालिकेची यंत्रणा ढिम्म असल्याने ठिकठिकाणी पाणी तुंबले. हजारो मुंबईकरांना घरी जाताना मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन मिंधे आणि पालिकेच्या अकार्यक्षमतेची पोलखोल केली. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी काल कुठेही पाणी तुंबले नसल्याचे जाहीर केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासाने ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई ठप्प झाल्याचे ते म्हणाले. प्रत्येक कामात होणाऱ्या भ्रष्टाचारामुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. वेळेत पंप सुरू केले नसल्याने मुंबईत पाणी साचल्याचेही त्यांनी सांगितले. ढिसाळ नियोजनामुळेच ही स्थिती ओढावल्याचा टोलाही त्यांनी लगावला. काल मुसळधार पाऊस होत असताना मुंबईचे पालकमंत्री कुठे होते? असा सवालही त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी खड्डेमुक्तीची घोषणा केली होती त्याचे काय झाले? असा सवाल करताना रस्त्यांचे अर्ध्या किलोमीटरचे काम झाले नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आपल्या कार्यकाळात डीपीडीसीच्या माध्यमातून सुरू केलेले संरक्षक भिंतींचे काम आता ठप्प पडल्याचेही ते म्हणाले.

नगरविकास खाते असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रशासकाकडून पालिकेचा कारभार सुरू आहे. या ठिकाणी भ्रष्टाचार करण्यासाठी टोळय़ा आहेत. रस्त्याचे कॉन्ट्रक्ट कुणी बघायचे, इमारतींचे कॉन्ट्रक्ट कुणी बघायचे, कॉन्ट्रक्टरना कुणी सांभाळायचे हे ठरलेले आहे, असा गौप्यस्फोटही आदित्य ठाकरे यांनी केला.

पालिकेचे 15 वॉर्ड वाऱ्यावर

पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये असणारा सहाय्यक आयुक्त हा त्या विभागाचा ‘मिनी कमिशनर’च असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून 15 वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्त नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या नसल्याने महापौर, नगरसेवक नाहीत. अशा वेळी नागरिकांनी जायचे तरी कुठे? असा सवालही त्यांनी केला.

मेट्रोमुळे बेस्टचे दरवर्षी 20 कोटींचे नुकसान

– मुंबई ठिकठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे बेस्टच्या मार्गांवर मोठा परिणाम झाला आहे. बॅरिकेड्स लावून रस्ते अडवण्यात आले आहेत. याचा जबर फटका बेस्टला बसत असून गेल्या दोन वर्षांपासून बेस्टचे दरवर्षी 20 कोटींचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

– सत्तेसाठी फक्त पक्ष फोडायचे, परिवार फोडायचे आणि धर्माधर्मात तेढ निर्माण करायची इतकाच कारभार मिंधे-भाजपकडून सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मुंबईकर रेल्वेमंत्री असणाऱ्या मंत्र्यांना कालचा प्रकार शोभणारा नाही. या राजवटीची प्रायोरिटी कंत्राटदार, पैसे आणि इतकीच आहे, असेही ते म्हणाले.

पालिका यंत्रणा पोलीस कुठे होते?

घाटकोपरमध्ये बुधवारी जोरदार पावसामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. बहुतांशी ठिकाणी हीच स्थिती होती. त्यामुळे काल अतिवृष्टी होत असताना पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस कुठे होते, असा सवाल करीत पोलीस काय फक्त व्हीआयपी आले की रस्त्यावर दिसणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पालिका, एसआरए, एमएमआरडीए अशा संस्थांकडून मुंबईची प्लॅनिंग अॅथोरिटी असल्याचे सांगितले जाते. मग या यंत्रणा काल कुठे होत्या, असा सवालही त्यांनी केला.

– मिंधे सरकारच्या भ्रष्टाचारामुळे मुंबई, ठाणे, पुण्यात पावसात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. गेल्या दोन वर्षांत आम्ही सहा-सहा हजारांचे घोटाळे उघड केले. आताही प्रत्येक कामात घोटाळा किंवा एक्सलेशन आहे. मिंध्यांच्या टोळय़ांकडून हे घोटाळे सुरू आहेत. नगरविकास खाते जवळ असलेल्या मिंध्यांना याची शरमही वाटत नाही. अशी भयंकर राजवट कधी पाहिली नाही. त्यामुळे यांना हाकलावेच लागेल.