ओशिवऱ्यातील एका घरासाठी 765 अर्ज, पुनर्विकास प्रकल्पातून मिळालेल्या घरांना जोरदार मागणी

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या यंदाच्या सोडतीत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला मिळालेल्या 370 घरांना जोरदार मागणी असल्याचे दिसतेय. 33(5) अंतर्गत या योजनेतील ओशिवरा येथील एका घरासाठी 765 अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 546 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. गोरेगाव सिद्धार्थ नगर येथील दोन घरांसाठी 749 अर्ज आले असून यापैकी 602 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. विक्रोळी कन्नमवार नगरमधील दोन घरांसाठी 446 अर्जदारांनी तर पुर्ला नेहरू नगर येथील 14 घरांसाठी 3124 अर्जदारांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले. अनुक्रमे 620 आणि 4026 अर्ज या घरांसाठी प्राप्त झाले होते. 33(7) अंतर्गत भुलेश्वर वेलकर स्ट्रीट येथील एका घरासाठी 533 अर्ज प्राप्त झाले असून 422 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली.

मुंबई मंडळातर्फे काढलेल्या 2030 घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्याची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत होती. यंदाच्या सोडतीत तब्बल 1,34,350 अर्ज आले असून यापैकी 1,13,811 अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटातील 359 घरांसाठी 47,134 जणांनी तर अल्प उत्पन्न गटातील 627 घरांसाठी 48,762 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली. मध्यम उत्पन्न गटातील 768 घरांकरिता 11,461 जणांनी तर उच्च उत्पन्न गटातील 276 घरांसाठी 6454 जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत.

आज प्रारूप यादी जाहीर होणार

शुक्रवार, 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता सोडतीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर 29 सप्टेंबरला दुपारी 12 वाजेपर्यंत ऑनलाईन दावे-हरकती अर्जदारांना दाखल करता येणार आहेत. 3 ऑक्टोबरला स्वीपृत अर्जांची अंतिम यादी जाहीर होईल, तर प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत 8 ऑक्टोबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरला काढण्यात येणार आहे.

दिंडोशीतील 45 घरांकरिता 11,280 अर्ज

मुंबई मंडळातर्फे नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये शिवधाम जुनी दिंडोशी, म्हाडा का@लनी मालाड या योजनेतील एका घरासाठी 419 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 291 अर्जदारांनी अनामत रकमेचा भरणा केला. तसेच शिवधाम का@म्प्लेक्स जुनी दिंडोशी, म्हाडा का@लनी मालाड या योजनेतील 45 घरांकरिता 11,280 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी 9,519 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली.