लेख – ‘एक्झिट एक्झाम’ पुढे ढकलण्यामागचे कारण काय?

>> प्राचार्य विजय राज

डी फार्मसी अभ्यासक्रमावर आधारित एक्झिट एक्झाम ही राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येते. शैक्षणिक वर्ष सन 2023-24 पासून सर्व औषधनिर्माण शास्त्र पदविका विद्यार्थ्यांना एक्झिट एक्झाम ही परीक्षा फार्मसी काwन्सिल ऑफ इंडिया (नवी दिल्ली) यांनी बंधनकारक केली आहे. परंतु ऑक्टोबर 2024 मध्ये होणारी ही परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्यामुळे संपूर्ण देशातील परीक्षा देणाऱ्या डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

औषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या डी फार्मसी शाखेतील विद्यार्थ्यांना डी फार्मसी उत्तीर्ण झाल्यानंतर एक्झिट एक्झाम देणे हे पीसीआय (नवी दिल्ली) या शिखर परिषदेने बंधनकारक केले आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार असून ती नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस), नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे. डी फार्मसी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर फार्मासिस्ट म्हणून रीतसर नोंदणी करण्यासाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. वर्षातून फक्त दोन वेळा ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणार असून प्रथमच होणारी परीक्षा ही 3, 4 व 5 ऑक्टोबर 2024 रोजी तीन दिवस तीन पेपर्स अशा पद्धतीने घेण्यात येणार आहे. परंतु 20 सप्टेंबरच्या एनबीईएमएस यांच्या अधिसूचनेनुसार ही परीक्षा अजून पुढे ढकलण्यात आल्याचे संकेतस्थळावर कळविण्यात आले आहे. या परीक्षेच्या संदर्भातील नवीन वेळापत्रक व परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल झाल्यास संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी सतत माहिती घ्यावी असे नमूद करण्यात आले आहे.

या एक्झिट एक्झामसाठी परीक्षा फॉर्म शुल्क 5900 रुपये एवढे प्रचंड असून तीन दिवस तीन पेपर्स असे स्वरूप असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ व तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे. तसेच तिन्ही पेपर्समध्ये 50 टक्के गुण पडलेच पाहिजेत आणि एकाच वेळी तिन्ही पेपरमध्ये उत्तीर्ण झालेच पाहिजे असे त्या नियमावलीमध्ये स्पष्ट नमूद केले आहे. परीक्षेसंदर्भातील या सर्व जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील व आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरलेले नाहीत.

अनेक विद्यार्थी संघटनांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच शिक्षक व महाविद्यालयांचे प्राचार्य, फार्मसी असोसिएशन, एपीटीआय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या माध्यमातून एक्झिट एक्झामच्या जाचक अटींच्या विरोधात निवेदने, निदर्शने, पत्रव्यवहार करून संबंधित संस्थेसमोर प्रश्न मांडून आवाज उठवला होता. परंतु दिलेल्या नियमावलीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही असे परीक्षा बोर्डाकडून 10 सप्टेंबरच्या पत्रानुसार कळविण्यात आले आहे. तरीसुद्धा अनेक गरजू विद्यार्थ्यांनी असंख्य तडजोड करून परीक्षा फॉर्म भरून अभ्यासाची तयारी सुरू ठेवली होती. 20 सप्टेंबर रोजीच्या अधिसूचनेनुसार ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे संकेतस्थळावर कळविण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे कोणतेही कारण अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु परीक्षा शुल्क कमी करावे, तीन पेपरऐवजी एकच पेपर घेण्यात यावा, अभ्यासक्रम कमी करावा, उत्तीर्णसाठीची मर्यादा 40 टक्के करावी, परीक्षेमधील प्रश्न डिप्लोमा फार्मसी दर्जाचे असावेत आदी कारणांमुळे परीक्षा पुढे गेली असावी अशी विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये पुजबुज सुरू आहे.

वरीलपैकी काही मुद्दे शिथिल करण्यात आल्यास असंख्य विद्यार्थ्यांना दिलासा मिळू शकतो. परीक्षा लवकरात लवकर उत्तीर्ण होऊन विद्यार्थी फार्मासिस्ट म्हणून नोंदणी करून फार्मसी क्षेत्रामध्ये आपली नोकरी किंवा व्यवसाय सुरू करतील अशी अपेक्षा आहे. यातील अटी व नियमावलीमध्ये बदल न झाल्यास नुकसान होऊ नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास नियमित सुरू ठेवलेला बरा.

– औषधनिर्माण शास्त्र शाखेतील दर्जात्मक व गुणात्मक शिक्षणाद्वारे तज्ञ पुशल आणि काwशल्य विकसित फार्मासिस्ट घडविणे, त्याचबरोबर बदलत्या काळानुसार सक्षम रुग्णसेवा देऊन औषधनिर्माण शास्त्र शाखेचा दर्जा उंचविणे या हेतूने डी फार्मसी एक्झिट एक्झाम घेण्याचा धोरणात्मक निर्णय फार्मसी काwन्सिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली (पीसीआय) या शिखर संस्थेने घेतला आहे. त्याअनुषंगाने डी फार्मसी उत्तीर्ण झालेल्या यापुढील विद्यार्थ्यांना एक्झिट एक्झाम उत्तीर्ण झाल्याशिवाय फार्मासिस्ट म्हणून अधिपृत नोंदणी करता येणार नाही.

(लेखक लिंब (सातारा) येथील गौरीशंकर डी फार्मसी या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत.)