प्रयागराजमध्ये मंदिरात बाहेरच्या प्रसादावर बंदी

तिरुपती बालाजी मंदिरात अशुद्ध प्रसादाचे प्रकरण समोर आल्यानंतर आता प्रयागराज येथील मंदिरात दिल्या जाणाया गोड प्रसादावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रसादामध्ये लाडू, पेढे यांचा समावेश आहे. तसेच बाहेरून प्रसाद आणण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. सध्या मंदिरात मंहतांनी भक्तांकडून प्रसाद म्हणून केवळ नारळ, इलायची दाना, सुखा मेवा आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रयागराज येथील अलोप शंकरी देवी मंदिरात देश-विदेशातून भक्त दर्शनासाठी येतात. मंदिराचे सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही संपूर्ण तपास केल्यानंतर प्रसाद बनवणार आहेत. हे काम मंदिराच्या परिसरात केले जाणार असून कमीत कमी किंमतीत ते भाविकांना उपलब्ध करून दिले जाईल, असे श्री पंचायती अखाडा महानिर्वाणीचे सचिव यमुना पुरी महाराज यांनी म्हटले.

नारळ, फळांना परवानगी

मंदिरात येताना भाविकांना प्रसाद म्हणून नारळ, फळे, सुखा मेवा, इलायची दाना घेवून येण्यास परवानगी देण्यात आली आहे. भविष्यात मंदिर परिसरात दुकाने उघडणार असून भक्तांना शुद्ध गोड प्रसाद उपलब्ध केला जाईल, असे ललिता देवी मंदिराचे मुख्य पुजारी शिव मुरत मिश्र यांनी सांगितले.