खोट्या लैंगिक छळाच्या तक्रारी करायला वकिलांचीच फूस, दिल्ली उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

लैंगिक गुह्यांच्या कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करणाऱयांवर कारवाई करणे आवश्यक आहे. वकीलही पक्षकारांना अशी खोटी प्रकरणे दाखल करण्याचा सल्ला देतात आणि त्यांना भडकवतात, हे पाहणेदेखील दुर्दैवी आहे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने नमूद केले. एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे म्हटले. लैंगिक छळाच्या खोटय़ा तक्रारी दाखल करण्यासाठी वकील चिथावणी देत असल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली. लैंगिक छळाशी संबंधित कायदेशीर तरतुदींचा गैरवापर आणि महिलांचा अपमान रोखण्यासाठी वकिलांना संवेदनशील बनविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही कोर्टाने म्हटले. घरमालक आणि भाडेकरू यांनी 2018 मध्ये एकमेकांवर लैंगिक छळाचे आरोप करत एकमेकांवर गुन्हे दाखल केले. यात महिला पुटुंबीयांना तक्रारदार बनवण्यात आले. दोन्ही पक्षांनी नंतर आपले सर्व वाद सामोपचाराने मिटवत शांततेने राहण्याचा निर्णय घेतला. तसेच खटले रद्द करण्यासाठी दोन्ही पक्षकारांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या.

गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई

लैंगिक गुह्यांच्या कायदेशीर तरतुदींचा गैरवापर करणाऱयांविरोधात कारवाई करणे आवश्यक आहे. अशा आरोपांमुळे आरोपींच्या प्रतिष्ठेवर गंभीर परिणाम होतो. वकिलांनी कोणत्याही प्रकरणात खोटी प्रकरणे दाखल करण्याचा सल्ला आपल्या अशिलाला देऊ नये, कायद्याचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी वकिलांनी आता संवेदनशील होणे गरजेचे आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.