चिंचवड विधानसभा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. त्यानंतरही जागा न मिळाल्यास आम्ही भाजपचे काम करणार नाही. आमच्यासमोर महाविकास आघाडीचा पर्याय खुला असल्याचा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी नगरसेवकांनी थेट अजितदादांना दिला.
चिंचवड येथे बुधवारी (२५ रोजी) झालेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली. सध्याच्या राजकीय परिस्थितीत प्रत्येकाला निवडणूक लढावी वाटत आहे. ‘ज्या पक्षाचा आमदार, त्या पक्षाला जागा’ असे सूत्र ठरल्याचे सांगितले जात असले, तरी चिंचवडची जागा राष्ट्रवादीला मिळावी, अशी आमची आग्रही मागणी असल्याचे माजी नगरसेवकांनी सांगितले.
मयूर कलाटे म्हणाले, ‘विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आम्ही सात ते आठ माजी नगरसेवक एकत्र आलो आहोत. आमची दिशा ठरली असून, त्यानुसार या वेळेला चिंचवडमध्ये बदल घडविणारच ! त्यानुसार आमची बांधणी, तयारी झाली आहे. भाजपमध्ये मोठी धुसफूस आहे. राष्ट्रवादीला मतदारसंघ मिळावा, अशी आमची मागणी आहे. जागा नाही मिळाली तर सर्व पर्याय खुले आहेत. अजित पवार यांनी मनधरणी केली तरी थांबणार नसून, महायुतीतून बाहेर पडणारच,’ असे ठामपणे कलाटे यांनी सांगितले. अजित पवारांची साथ सोडणार नाही; पण भाजपचे काम करणार नाही. भाजपचे 10 ते 12 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी केला.
अपयशी चेहऱ्यांना संधी देऊ नका
‘चिंचवडची जागा राष्ट्रवादीला न मिळाल्यास आमच्यासमोर महाविकास आघाडीचा पर्याय आहे. चांगला, नवखा उमेदवार दिला जाईल. पोटनिवडणुकीनंतर चिंचवडमधील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. चार-पाच वर्षांपूर्वी राजकारणात आलेले विधानसभेसाठी इच्छुक आहेत. आम्ही तर अनुभवी आहोत. चिंचवड मतदारसंघात 2014, 2019 आणि पोटनिवडणुकीत अपयश आलेल्या चेहऱ्यांना संधी देऊ नये. नवीन चेहरा द्यावा,’ अशी मागणी माजी नगरसेवकांनी केली.