लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने भाजपच्या नेतृत्त्वातील महायुतीला जोरदार धक्का देत महाविकास आघाडीवर मतांचा पाऊस पाडला. आता विधानसभा निवडणुकीवेळी देखील अनेक सर्वे रिपोर्ट महाविकास आघाडीला चांगला विजय मिळतील असं चित्र असल्याचे दाखवत आहेत. अशातच भाजपला छत्रपती संभाजीनगर मधून आणखी एक मोठा धक्का बसला असून भाजप नेते दिनेश परदेशी यांनी आज ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी नागपुरात केलेल्या विधानाचा कडक शब्दात समाचार घेतला. ‘हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला खतम करतो ते दाखवून देतो’, अशा खणखणीत शब्दात उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलं.
दिनेश परदेशी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात बोलताना, ‘गेल्या आठवड्यात मी वैजापूरमध्ये येऊन गेलो होतो. त्याच वेळेला दिनेशजी प्रवेश करणार होतात. आता हा उलटा प्रवास सुरू झाला आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेत आलात. भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगतो तुमच्यात भेसळीचा कार्यक्रम सुरू झाला आहे, तो तुम्हाला मान्य आहे का?’, असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपच्या निष्ठावंतांना केला.
तसेच ‘हिंदुत्त्वाच्या नावाखाली यांनी जे थोतांड माजवलेलं आहे हे हिंदुत्त्व माझं नाही. माझं हिंदुत्त्व वेगळं आहे’, हे पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
‘काल महाराष्ट्राच्या बाहेरचे बाजारबुणगे नागपुरात येऊन गेले आणि आम्हाला खतम करण्याचं भाषा करून गेले. आता ते भाषण मी ऐकलेले नाही. पण हे बाजारबुणगे आहेत यांना महाराष्ट्र आपल्या टाचेखाली घ्यायचा आहे. त्यांना कल्पना नाही की हा महाराष्ट्र हा वीरांचा महाराष्ट्र आहे’, असं उद्धव ठाकरे यांनी ठणकावलं.
‘हा बाजारबुणगा नागपुरात येऊन गेला आणि म्हणतो की, उद्धव ठाकरेंना खतम करा आणि शरद पवारांना खतम करा असं म्हणाला. हिंमत असेल तर येऊन बघ, कुणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो, अशा खणखणीत शब्दात उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलं. यावेळी ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी ‘मातोश्री’चा परिसर दणाणला.