Jayakwadi dam alert – जायकवाडी धरण ओव्हरफ्लो; 12 दरवाजे दुसऱ्यांदा उघडले, गोदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

>> बद्रीनाथ खंडागळे

मराठवाड्याची जीवनवाहिनी असणारे जायकवाडी धरण 100 टक्के भरले असून जलाशयामध्ये सध्या 4 हजार 169 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे नाथसागर प्रकल्पाचे 27 पैकी 12 दरवाजे प्रत्येकी अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहे. धरणाचे दरवाजे दुसऱ्यांदा उघडण्यात आले असून गोदावरी नदीपात्रामध्ये 6 हजार 788 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिली.

1522 फूट जलक्षमता असलेल्या या धरणात आज 1521.90 फूट पाणीपातळीची नोंद झाली. 99.80 टक्के पाणीसाठा असताना ‘वर’च्या भागातील पावसाचे 4 हजार 169 पाणी नव्याने दाखल होत आहे. त्यामुळे जलसंपदा प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला.

नाथसागर प्रकल्पाचे 10, 11, 12, 14, 16, 18, 19, 21, 23, 25, 26 व 27 क्रमांकाचे 12 दरवाजे प्रत्येकी अर्धा फूट वर करून 6 हजार 228 क्युसेक्स पाण्याचा गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या दगडी धरण विभागाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी ही माहिती दिली असून गोदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जायकवाडी धरणामध्ये 24 ऑगस्ट रोजी केवळ २ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. नाथसागरची पाणीस्थिती चिंताजनक बनली असताना नाशिक व नगर भागातील पावसाचे पाणी येण्यास सुरुवात झाली. नंतर पाणलोट क्षेत्रात असलेली 9 धरणे तुडुंब भरली. त्यामुळे वरच्या धरणातून जलविसर्ग केला गेला. 8 सप्टेंबर रोजी जायकवाडी धरण पूर्णक्षमतेने भरले. 9 सप्टेंबर रोजी पहिल्यांदा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते. 5 दिवसांनंतर ते टप्प्याटप्प्याने बंद करून जलविसर्ग थांबवण्यात आला होता. त्यानंतर आता दुसऱ्यांदा दरवाजे उघडण्यात आले आहेत.

पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढण्याची शक्यता पाहून विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या नागरिकांनी नदीपात्रात प्रवेश करू नये. कुठलीही जिवीत व वित्त हानी होऊ नये यासाठी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी. काठावरील शेतात बांधलेले पशुधन सुरक्षित ठिकाणी घेऊन जावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.