पत्रकारांचा लवाजमा घेऊन चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिरसाटांचा पोपट झाला; मिंध्यांच्या सिडको अध्यक्षांचे विमान अदानींनी जमिनीवर उतरवले

मिंध्यांचे सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांचे ‘विमान’ अदानी समूहाने आज जमिनीवर उतरवले. अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर शिरसाट यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या साईटचा दौरा केला. या साईट व्हिजिटसाठी त्यांनी पत्रकारांनाही बरोबर नेले. मात्र अदानी समूहाने पत्रकारांना विमानतळाच्या साईटवर जाण्यापासून रोखले. सिडकोचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी विनंती करूनही अदानी समूहाने त्यांचे काहीएक ऐकून घेतले नाही. त्यामुळे पत्रकारांचा लवाजमा घेऊन चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिरसाटांचा चांगलाच पोपट झाला आहे.

पत्रकारांनी केला निषेध

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या साईटचा आतापर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, केंद्रीय उड्डाणमंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष यांनी दौरा केला आहे. मात्र या तिन्ही दौऱ्यांपासून पत्रकारांना दूर ठेवण्यात आले आहे. आजही खुद्द सिडको अध्यक्षांनी ठरवलेल्या दौऱ्यातही पत्रकारांना गेटवरच अडवण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पत्रकारांनी या प्रकाराचा निषेध केला आणि अध्यक्षांच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. प्रसारमाध्यमांना रोखून अदाणी समूहाला नेमके काय लपवायचे आहे, असा सवाल पत्रकारांनी केला आहे.

लपवाछपवीत दडलंय काय?

विमानतळाचे काम येत्या मार्च 2025 पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा सरकारने केली असली तरी प्रत्यक्षात मात्र मोठ्या प्रमाणात काम बाकी राहिल्याने ही डेडलाईन हुकण्याची शक्यता आहे. वस्तुस्थिती लपवण्यासाठीच प्रसिद्धीमाध्यमांना धावपट्टी आणि टर्मिनलपर्यंत पोहोचू दिले जात नाही. लपवाछपवीमागे हेच गूढ दडले की काय, असा संशय नवी मुंबईकरातून व्यक्त होऊ लागला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सिडकोचा महत्त्वाकांक्षी नवी प्रकल्प आहे. या विमानतळावरून मार्च 2025 मध्ये विमानाचे टेकऑफ आणि लँडिंग केले जाणार आहे. ही डेडलाईन सहा महिन्यांवर आलेली असतानाही सिडकोने या विमानतळाच्या साईटवर पत्रकारांना एकदाही नेलेले नाही. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी आज विमानतळाच्या कामाची पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्याचे सर्व पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार पत्रकार विमानतळाच्या साईटवर गेले असता त्यांना प्रवेशद्वारावर रोखण्यात आले. अध्यक्ष शिरसाट आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी पत्रकारांच्या साईट व्हिजिटची व्यवस्था करा, असे अदानी समूहाला सांगितले. मात्र अदानी समूहाने पत्रकारांच्या गाड्या प्रवेशद्वारावरच रोखून धरल्या. त्यामुळे पत्रकारांना सोबत घेऊन नौटंकी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिरसाट यांना निमूटपणे एकट्यावरच विमानतळ प्रकल्पाची पाहणी करण्याची नामुष्की ओढवली.

अध्यक्षांच्या घोषणेला दुजोरा नाही

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची चाचणी घेण्यासाठी येत्या 5 ऑक्टोबर रोजी एअर फोर्सचे विमान विमानतळावर उतरवण्यात येणार आहे. याप्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहणार आहेत, अशी घोषणा सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी केली. मात्र त्यांच्या या घोषणेला सिडको प्रशासनाने कोणताही दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विमानाच्या लँडिंगबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.