सहकारी संस्था संपवण्याचे घातक राजकारण खेळले जात आहे, शरद पवार यांची टीका

सामान्य माणसाला आर्थिक गरजेपोटी सावकारांच्या दारात उभे राहायला लागू नये, या उदात्त हेतूने अर्थपुरवठा करणाऱया सहकारी संस्थांची निर्मिती झाली. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या वतीने विविध कायदे करून गेल्या काही वर्षांमध्ये 500 संस्था बंद केल्या आहेत. सहकारी संस्थांना बळ देण्याऐवजी त्या संपवण्याचे घातक राजकारण खेळले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानाकरून पवार बोलत होते. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते -पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चक्हाण, आमदार जयंत आसगाककर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभय जगताप, निकृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, संभाजीराव थोरात, उदय शिंदे, डॉ. अरुणा बर्गे, किरण यादव, व्हा. चेअरमन शहाजी खाडे, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, प्राथमिक शिक्षक बँकेची स्थापना करणारे कृष्णराव बाबर यांचे शैक्षणिक संस्थांमध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या कन्या सरोजनीताई बाबर यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षक बँकेचा पूर्वइतिहास चांगला आहे. शिक्षकांची पुढची पिढी जिह्यातील सहकारी संस्थांच्या पतपुरवठय़ामुळे उच्चस्थानी जाऊ शकली. सामान्य लोकांच्या हक्काच्या साथीदार ठरलेल्या सहकारी बँका मोडित काढण्याचा प्रकार काही वर्षांपासून सुरू आहे, असेही ते म्हणाले.

खासदार धैर्यशील मोहिते म्हणाले, शिक्षकांना अतिरिक्त कामे दिली गेल्याने त्याचा त्यांना त्रास होत आहे. सगळ्या कामाचे ओझे हे शिक्षकांवरच टाकले जाते. गुरुजींना ज्ञानदानासाठी वेळ उपलब्ध करून दिला तर प्राथमिक शाळांतील पटसंख्याही वाढेल.

संभाजीराव थोरात म्हणाले, खासदार शरद पवार हे प्राथमिक बँकेच्या सुवर्ण, अमृत आणि शताब्दी अशा तिन्ही कार्यक्रमाला प्रमुख म्हणून उपस्थित राहिले आहेत. शिक्षकाला पगार कमी असल्याने लग्नाला मुलगीही कोणी देत नव्हते. त्यावेळी खासदार शरद पवार यांनी केंद्राप्रमाणे राज्यातील कर्मचाऱयांसाठीही वेतन आयोग लागू केल्याने शिक्षकांची आर्थिक परिस्थिती चांगली झाली आहे. बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने यांनी सूत्रसंचालन केले.