अल्कोहोलनिर्मिती कारखान्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, दूषित पाणी ओढे, नाल्यांत; पाणी प्रदूषणाचा प्रश्न

गडहिंग्लज तालुक्यातील बेरडवाडी येथील धान्यापासून अल्कोहोलनिर्मिती कारखान्याचे दूषित पाणी ओढय़ा- नाल्यांमध्ये सोडले जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. येत्या पंधरा दिवसांत योग्य त्या उपाययोजना कराव्यात; अन्यथा गुरा-ढोरांसह मोर्चा काढण्याचा इशारा हिरण्यकेशी नदी प्रदूषणमुक्त संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकाऱयांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सदर निवेदन माजी सभापती अमर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, भडगाव-बेरडवाडी येथे मेसर्स गडहिंग्लज ऍग्रो अल्कोकेम लिमिटेड हा धान्यापासून अल्कोहोलनिर्मितीचा कारखाना सुरू आहे. या कारखान्याचे दूषित पाणी भडगाव गावच्या ओढय़ा-नाल्यात सोडले जाते. यामुळे येथील पाणी प्रदूषित झाले आहे. परिणामी नागरिकांचे, पशू-पक्ष्यांचेदेखील आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर याचा परिणाम शेतजमिनींवरदेखील होत आहे. यापूर्वी कारखाना व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला लेखी निवेदने देऊनदेखील कारवाई झालेली नाही. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत कार्यवाही न झाल्यास तीक्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

यावेळी अमरसिंह चव्हाण, शिवप्रसाद तेली, राजू चौगुले, रवींद्र शेंडुरे, बाळासा कोरी, रविशंकर बंदी, महादेव घोलराखे, शंकर चोथे, बसवराज बंदी, सुभाष भोई, काशिनाथ चव्हाण, परशुराम भोई, महादेव भोई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.