मुंबई बँकेची मोबाईल नेट बँकिंग सेवा लवकरच

मुंबई बँकेची 50 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव नाटय़ मंदिर येथे झाली. बँकेचे सदस्य मोठय़ा संख्येने या सभेला उपस्थित होते. मुंबई बँकेने या आर्थिक वर्षात ठेव वृद्धी कार्यक्रम हाती घेतला असून त्या अंतर्गत ठेवीवर विशेष व्याजदर जाहीर केला आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रात ज्या गृहनिर्माण संस्थांची नोंदणी झाली आहे, परंतु त्या संस्था काही तांत्रिक कारणामुळे बँकेच्या सभासद झालेल्या नाही अशा संस्थांना बँकेचे सभासद करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले. बँकेला सातत्याने 5 ते 6 वर्षे ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे. मुंबई बँकेची अनेक वर्ष प्रलंबित असलेली मोबाईल नेट बॅंकिंग सेवेची परवानगी रिझर्व्ह बँकेने दिली आहे. ही सेवा ग्राहकांना, सहकारी संस्थांना पुढील दोन महिन्यांत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुंबई जिल्हा बँकेने सहकारी गृहनिर्माण संस्थांकरिता स्वयंपुनर्विकास धोरण तयार करून अमलात आणले आहे. या योजनेंतर्गत गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के व कमाल 50 कोटी रुपये कर्ज पुरवठा आरबीआय, नाबार्ड यांच्या मार्गदर्शक तत्त्वांना अधीन राहून केला जातो. पूर्व उपनगरातील गृहनिर्माण संस्थांसाठी गृहनिर्माण फेडरेशनचे उपकेंद्र विक्रोळी येथे सुरू केले जाणार आहे. याबाबत बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी माहिती दिली. सभेला सर्व संचालक व अधिकारी उपस्थित होते.