फुलंब्रीत तहसीलदारांची खुर्ची जाळली; मनोज जरांगे यांची प्रकृती ढासळली… संतप्त मराठा आंदोलक आक्रमक

मराठा आरक्षणासाठी आठ दिवसांपासून बेमुदत उपोषण करणारे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती ढासळली आहे. सरकार उपोषणाची दखल घेत नसल्यामुळे संतापलेल्या मराठा समाजाने रस्त्यावर उतरून तीन तास धुळे-सोलापूर महामार्ग रोखला. अचानक करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. फुलंब्री येथे मराठा आंदोलक आक्रमक झाले. या आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून पेटवून दिली.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी 16 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या उपोषणाकडे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष केले आहे. शंभुराज देसाई आणि दीपक केसरकर या दोन मंत्र्यांनी मध्यस्थीसाठी संपर्प केला आणि दोन दिवसांची मुदत मागून घेतली. ही मुदतही आता संपली आहे. मनोज जरांगे यांनी कोणताही वैद्यकीय उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत असून त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. साखरेचे प्रमाणही घटले आहे. आज त्यांचा आवाजही क्षीण झाला.

सरकार जाणीवपूर्वक मनोज जरांगे यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांनी अचानक धुळे-सोलापूर महामार्गावर ठाण मांडले. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. दोन तास रास्ता रोको करण्यात आल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. पोलिसांनी विनंती करूनही आंदोलकांनी ऐकले नाही. अखेर मराठा समन्वयकांनी समजूत काढल्यानंतर आंदोलकांनी महामार्ग मोकळा केला.

वैद्यकीय तपासणी करण्यासही नकार

उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगे यांनी कोणत्याही वैद्यकीय तपासणीला नकार दिला. सोमवारी लघुशंकेसाठी जात असताना जरांगे यांना चक्कर आली. आज दिवसभरातही त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. त्यांचा आवाजही क्षीण झाला आहे. वैद्यकीय पथकाने दोन वेळा जरांगे यांना तपासणी करू देण्याची विनंती केली, मात्र त्यांनी तपासणीस स्पष्ट नकार दिला. जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनीही वैद्यकीय तपासणीसाठी विनंती केली, परंतु जरांगे यांनी ती धुडकावून लावली.

फुलंब्रीत मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

फुलंब्री येथे मराठा आंदोलक आक्रमक झाले. या आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची बाहेर आणून पेटवून दिली. मराठा आंदोलक सकाळी तहसीलसमोर गोळा झाले. घोषणाबाजी सुरू झाली. अचानक काही आंदोलकांनी तहसीलदारांच्या कक्षातून त्यांची खुर्ची आणली. सरकार मराठा आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी खुर्ची पेटवून दिली.

ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका; प्रा. हाके यांचा सरकारला इशारा

धनगर समाजाला देण्यात येणारे अनुसूचित जमातीचे आरक्षण अगोदर जाहीर करा, मग ओबीसी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करू, असे ओबीसी आरक्षण बचावसाठी उपोषणाला बसलेले प्रा. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी सांगितले. सरकारने ओबीसी आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, ते महागात पडेल, असा इशाराही या नेत्यांनी दिला. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचेही प्रा. हाके यांनी स्पष्ट केले.