पूर्व-पश्चिम एक्प्रेस वे सर्व्हिस रोड दुरुस्तीसाठी पंधराशे कोटींचे टेंडर, कंत्राटदारावर दहा वर्षांच्या हमी कालावधीचे बंधन

मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारकडून ताब्यात घेतलेल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांच्या सर्व्हिस रोडची मोठी दुरुस्ती लवकरच करण्यात येणार असून यासाठी पालिकेने तब्बल 1591 कोटींचे टेंडर काढले आहे. यामध्ये दोन्ही द्रुतगती महामार्गांवरील पुलांजवळील जंक्शन आणि स्लिप रोडची दुरुस्तीही केली जाणार आहे. या कामानंतर कंत्राटदारावर या रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी दहा वर्षे राहणार असल्याची माहिती पालिकेच्या रस्ते विभागाकडून देण्यात आली.

मुंबईत पालिकेच्या अखत्यारीत सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. या रस्त्यांवर पावसाळ्यात मोठय़ा प्रमाणावर खड्डे पडत असल्याने पालिकेला मोठय़ा टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे पालिका सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण राबवत आहे. याच धर्तीवर अनेक वर्षांपूर्वी बांधलेल्या ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्प्रेस वे सर्व्हिस रोडची सद्यस्थितीत प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या सर्व्हिस रोडची दुरुस्ती सिमेंट काँक्रिटने करण्यात येणार आहे.

असे होणार काम

पूर्व द्रुतगती मार्ग ः लांबी 19 किमी
पश्चिम द्रुतगती मार्ग लांबी ः 25 किमी
दोन्ही मार्गांची एपूण लांबी ः 88 किमी
सर्व्हिस रोडचीही लांबी ः 88 किमी
रुपये 15913508736 कोटींची निविदा
पंत्राटदाराचा हमी कालावधी दहा वर्षे

खड्डय़ांसाठी याआधी 75 कोटींचे टेंडर

ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्प्रेस वेवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने याआधी 75 कोटींचे टेंडर काढले होते. या रकमेतून दोन्ही मार्ग आणि सर्व्हिस रोडवरील खड्डय़ांची दुरुस्ती करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत किमान 20 कोटी रक्कम खर्च झाल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.