रश्मी शुक्लांची पदावरून हकालपट्टी करा! नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झालेली असतानाही भाजप महायुती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली. रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक निष्पक्ष वातावरणात पार पाडण्यासाठी वादग्रस्त रश्मी शुक्लांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

रश्मी शुक्ला 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी असून सध्या पोलीस महासंचालक पदाबरोबरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा अतिरिक्त पदभारही त्यांच्याकडेच आहे. शुक्ला यांच्या जून 1964 या जन्मतारखेनुसार त्या जून 2024 मध्ये सेवानिवृत्त होतात, पण महाराष्ट्र पोलीस कायद्याचे थेट उल्लंघन करून त्यांना बेकायदेशीरपणे जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांचा कार्यकाळ दोन वर्षे किंवा त्यांच्या निवृत्तीपर्यंत असा आहे. या बेकायदेशीर मुदतवाढीव्यतिरिक्त रश्मी शुक्ला यांचा बेकायदेशीर पृत्यांचा इतिहास आहे.

त्यांची कलंकित कार्यपद्धती पाहता महाराष्ट्रातील आगामी निवडणूक निष्पक्ष वातावरणात पार पडणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांना पदावरून हटवणे गरजेचे असल्याचे नाना पटोले यांनी पत्रात नमूद केले आहे.

z रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी आणि धमक्या देण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला आहे. अनेकदा खोटे गुन्हे दाखल केले आहेत. रश्मी शुक्ला या भाजपसाठी राजकीय प्रचारक म्हणून काम करत आहेत. रश्मी शुक्ला यांनी विरोधी पक्षनेत्यांचे पह्न बेकायदेशीरपणे टॅप केले असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रात भाजप सत्तेत आल्यावर त्यांच्यावरील कारवाई रखडली आहे.