केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील महामंडळाला बीकेसीत भूखंड, नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला जागा मिळणार

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) या महामंडळाला वांद्रे-पुर्ला संपुलातील जी ब्लॉकमध्ये भूखंड देण्यास आज झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत मान्यता देण्यात आली, तर दुसरीकडे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना मुंबई आणि नवी मुंबईशी थेट जोडण्यास मान्यता देण्यात आली.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 158 वी बैठक झाली. या बैठकीत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना मुंबई आणि नवी मुंबईशी थेट जोडण्यासाठी सल्लागाराने तयार केलेल्या बदलापूर ते विरार-अलिबाग मल्टिमोडल का@रिडॉर या प्रवेश नियंत्रित महामार्ग प्रकल्पाच्या प्राथमिक आखणी अहवालाला या बैठकीत मान्यता देण्यात आली. या मल्टिमोडल का@रिडॉर प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यासही मान्यता देण्यात आली.

या बैठकीत बॅकबे रिक्लेमेशन योजनेचा सुधारित विकास आराखडा सादर करण्यात आला. त्यामध्ये समुद्रकिनारे आणि खारफुटीसारख्या नैसर्गिक वैशिष्टय़ांवर विशेष लक्ष देऊन या क्षेत्राचे निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या भागात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी ‘मरिना’ पर्यटन प्रकल्पाचा समावेश असून त्यामध्ये लहान बोटी आणि नौकांसाठी खास बंदर असणार आहे. हा सुधारित प्रारूप आराखडा मंजूर करून नागरिकांच्या सूचना मागविण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.