इंडिगोला आव्हान; आकाशात ‘शंख’नाद घुमणार, उत्तर प्रदेशातील नवी विमान कंपनी देशांर्तगत उड्डाण करण्यासाठी सज्ज

हिंदुस्थानात सध्या इंडिगोचा दबदबा आहे. विमान वाहतूक बाजारपेठेत इंडिगोचा 60 टक्क्यांहून जास्त वाटा आहे. सध्या इंडिगो देशातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. इंडिगोपाठोपाठ एअर इंडिया ही दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी आहे. टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाइन्सच्या संयुक्त मालकीच्या विस्ताराचे पुढील वर्षापर्यंत विलिनीकरण करण्याची कंपनीची योजना आहे.

देशात आणखी एक विमान कंपनी उड्डाणासाठी सज्ज झाली आहे. शंख एअर असे या विमान कंपनीचे नाव आहे. देशात नागरी हवाई वाहतुकीसाठी वाहतूक मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच ऑपरेशनसाठी दिलेली एनओसी तीन वर्षांसाठी वैध असणार आहे. कंपनीने एफडीआय नियमांच्या संबंधित तरतुदीचे तसेच यासंबंधी लागू केलेल्या अन्य नियमांचे पालन करावे, असे मंत्रालयाच्या मंजुरी पत्रात स्पष्टपणे निर्देश दिले आहेत. या कंपनीला आता उड्डाण सुरू करण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) ची परवानगी घ्यावी लागणार आहे. शंख एअरलाइन ही उत्तर प्रदेशातील पहिली विमान सेवा असणार आहे. या कंपनीची केंद्रे लखनौ आणि नोएडा येथे आहे.

u मोठय़ा कंपन्यांच्या तुलनेत छोटय़ा कंपन्यांसमोर खडतर मार्ग आहे. यात गो एअरलाइन्स इंडिया लिमिटेड विमान कंपनी होती. गेल्या वर्षी मे महिन्यात ही विमान सेवा बंद झाली. स्पाइसजेटपुढे आर्थिक आव्हान आहे. स्पाइसजेटचा बाजारपेठेतील वाटात गेल्या वर्षी 5.6 टक्क्यांवरून आता 2.3 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.