हिंदी बिग बॉससाठी मराठी बिग बॉस लवकर संपणार? मराठी प्रेक्षक भडकले…

बिग बॉस मराठीचे यंदाचे पर्व हे सुरुवातील 100 दिवसाचे असल्याचे जाहीर केले होते मात्र आता हा हा शो 70 दिवसात संपणार असल्याचे बिग बॉसने जाहीर केले आहे. सोमवारी बिग बॉसने याबाबत घोषणा केली. मराठी बिग बॉस सध्या प्रसिद्धी शिखरावर असताना, तसेच टीआरपीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक होत असताना बिग बॉसने अचानक हा शो 70 दिवसाचा का केला असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

हिंदी बिग बॉस साठी घेतला निर्णय

सलमान खान याचे हिंदी बिग बॉस हे येत्या 6 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. सध्या मराठी बिग बॉसला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अशात हिंदी बिग बॉस सुरू झाले तर मराठी बिग बॉसचा हिंदी शोला मोठा फटका बसू शकतो. कारण महाराष्ट्रातील जनता ही हिंदी पेक्षा मराठी शो लाच जास्त प्राधान्य देऊ शकते. त्यामुळे हिंदी बिग बॉसला चांगला टीआरपी मिळावा म्हणून मराठी बिग बॉस लवकर संपवण्यात येत असल्याचे समजते.

नेटकरी भडकले

हिंदी बिग बॉससाठी मराठी बिग बॉस लवकर संपवणार असल्याची चर्चा सध्या सुरू असल्याने मराठी प्रेक्षक बिग बॉस निर्मात्यांवर चिडले आहेत. मराठीच्या पाचव्या सिझनचा खेळ रंगात असताना अचानक खेळाचे 30 दिवस कमी केल्याने नेटकरी भडकले आहेत. हिंदी बिग बॉससाठी मराठी कलाकारांवर असा अन्याय का? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. तर मराठीचा गाजत असलेला सिझन बंद करून कलर्स मराठीने स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारल्याची टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे. तर काहिंनी ज्या हिंदी साठी मराठीचा सिझन बंद करतायत तो हिंदी बिग बॉसचा हा सिझन चालेलच का याची काही गॅरंटी आहे का? असा सवाल देखील नेटकऱ्यांनी केला आहे.

हिंदीच्या दबावामुळे मराठी बिग बॉस बंद करत असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. त्यावरून नेटकरी देखील मराठी प्रेक्षक दुखावला गेला असल्याची प्रतिक्रीया व्यक्त करत आहेत. ”मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नाही हिंदी मुळे, मराठी पुन्हा एकदा झुकली हिंदी समोर.. वाईट आहे हे खरच… दिल्ली चा ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे विसरलात बहुतेक तुम्ही”, अशी प्रतिक्रीया एका नेटकऱ्याने व्यक्त केली आहे. ”परत एकदा मराठी माणसांचा आवाज दाबण्याचा सफल प्रयत्न कलर्स कडून शो संपवण्याचा दिला आदेश हिंदी बिग बॉस या सिरीयल साठी” असे एका युजरने ट्विट केले आहे.