बदलापूर प्रकरणातील आरोपीचे कोणीही समर्थन केले नाही, स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न : नाना पटोले

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचे पोलीसांनी एन्काउंटर केले, याप्रकरणात आरोपीचे कोणीही समर्थन केलेले नाही. विरोधी पक्षांनी या एन्काऊंटवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत, त्याची उत्तरे सरकारने दिली पाहिजेत. सरकार उत्तरे न देता विरोधकांवरच प्रश्न उपस्थित करत आहे. भाजपा सरकार पापी व खोटारडे असून स्वतःचे पाप दुसऱ्यावर ढकलत आहे. अक्षय शिंदे सारखेच बदलापूर प्रकरणातील सर्व आरोपींचे एन्काऊंटर करा, विरोधक सरकारच्या पाठीशी उभे राहितील, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, बदलापूरच्या त्या शाळेत लहान मुलींचे पोर्न व्हीडीओ बनवले जात होते अशी माहिती समोर आली आहे, हे अत्यंत भयावह आहे. ती शाळा भाजपा, आरएसएसची असून शाळेतील कृत्ये लपवण्यासाठी व शाळेच्या संचालकांना वाचवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. साध्या पाकीटमारालाही पोलीस हातकडी बांधून घेऊन जातात मग अक्षय शिंदेला हातकड्या घातल्या नव्हत्या का? तो काय तुमचा जावई होता का? ज्या पोलिसाची रिव्हॉलव्हर अक्षय शिंदेने घेतली ती लॉक नव्हती का? बदलापूर प्रकरणातील बाकीचे आरोपी अजून का पकडले गेले नाहीत? हे प्रश्न उपस्थित होतात. जे लोक या प्रकरणात आहेत त्या सर्वांना अक्षय शिंदे सारखीच शिक्षा द्या. बदलापुरातच अशी घटना घडली असे नाही तर गृहमंत्र्यांचे शहर नागपुरातही अलिकडच्या काळात यापेक्षा भयानक घटना घडली आहे. राज्यात लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमध्येही प्रचंड वाढ झाली आहे असे नाना पटोले म्हणाले.