बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट? शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप

बदलापूरमधील एका शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काऊंटर झालं आहे. अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरच्या घटनेने फक्त राज्यातच नव्हे तर देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून विरोधी पक्षांनी महायुती सरकारची कोंडी केली आहे. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. या ट्विस्टने मोठी खळबळ उडवून दिली आहे.

शाळेचे ट्रस्टी मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभागी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. बड्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्यानं संपूर्ण तपास तातडीनं सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करत आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी हायकोर्टात जनहीत याचिका केली आहे. अक्षय शिंदेनं पोलिसांकडे माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्याचा दावाही याचिकेतून करण्यात आला आहे.

हायकोर्टाने स्थापन केलेल्या विशेष समितीपुढे आरोपी गेला तर प्रकरण वेगळ्याच वळणार जाईल, या भीतीनं त्याचा एन्काऊंटर झाल्याचा गंभीर आरोप याचिकेतून याचिकेतून करण्यात आला आहे. बदलापूर घटनेचा गुन्हा नोंद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या शाळेतून आणखी एक मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच पोलीस ठाण्यात दाखल झाल्याची माहिती आहे. ट्रस्टी आणि शाळेतून सीसीटीव्ही गायब करणारा कर्मचारीही अद्याप फरार असल्याने ठाणे पोलीस आणि एसआयटीच्या कारभारावर सवाल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.