मेहकरात दिवसाढवळ्या चोरी; 70 हजारांचा एैवज लंपास

बुलढाण्यातील मेहकर शहरात रामनगर मधील हरण टेकडी परिसरात सोमवारी चोरीची घटना घडली. भरदिवसा घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम 25 हजार रुपये, सोने, चांदीचे दागिण्यासह एकूण 70 हजाराचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरात हरण टेकडी परिसरात अनिल भुसारी नावाचे एक व्यक्ती राहतात. ते टी.व्ही.मेकँनिक आहेत. त्यामुळे ते सतत फिरस्तीवर असतात. तर त्यांची पत्नी मनिषा अनिल भुसारी या मेहकर आगारात वाहक आहेत. घरात नवरा बायको दोघेच राहतात. शुक्रवार दि २० पासून अनिल भुसारी हे छत्रपती संभाजीनगरला गेले होते. दि २३ ला सकाळी मनिषा या नौकरी निमित्ताने घर बंद करून गेल्या होत्या. या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी भुसारी यांचे घरात प्रवेश करून नगदी 25 हजार व मुलीचे सोन्याचे दागिने व सँमसंग मोबाईल असा एकूण 70 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. सोमवारी दुपारी ड्युटी संपल्यावर मनिषा भुसारी घरी यायला निघाल्या. घरी आल्यानंतर असता चोरी झाल्याचे त्यांना समजले. यानंतर पोलीसात तक्रार दिली असता पोलीस उपनिरीक्षक सम्राट ब्राह्मणे,पोलीस हेड कॉन्स्टेबल सदानंद चापले व टीमने घटनास्थळी भेट दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीचा तपास सुरू केला. यावेळी हस्तरेषा तज्ञ टीमने आरोपीच्या हाताच्या ठशांचे नमुने नेले आहेत. यानंतर रात्री साडे दहा वाजता याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.