युनेस्कोच्या नामांकनासाठी राज्यातील 11 शिवकिल्ले; सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे सह्यांची मोहीम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले विजयदुर्ग यांसह महाराष्ट्रातील 11 गडकिल्ले आणि तामिनाडूमधील 1 किल्ला असे एकूण 12 किल्ले युनेस्कोने नामांकनासाठी निवडले आहेत. त्याचा आढावा घेण्यासाठी युनेस्कोचे पथक 27 सप्टेंबर 2024 ते 7 ऑक्टोबर 2024 दरम्यान येणार आहे. या 12 किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, तेथे कोणतेही अनुचित कृत्य किंवा अस्वच्छता करू नये याच्या जनजागृतीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग मार्फत किल्ले विजयदुर्ग येथे ‘चला होऊ या जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार’ या ब्रीदवाक्यातून नामांकनाच्या समर्थनार्थ सह्यांची मोहीम राबवण्यात आली.

सिंधुदुर्ग विभागाचे जिल्हाध्यक्ष सुनिल राऊळ यांच्या नेतृत्वाखाली, दिपक करंजे, जिल्हा सचिव यांनी सह्यांची मोहीम राबविली. किल्ले विजयदुर्ग येथे विजयदुर्ग गावचे प्रथम नागरिक सरपंच रियाझ काझी यांनी आपली स्वाक्षरी करून या स्वाक्षरी मोहिमेचा शुभारंभ केला. आपला इतिहास जगाच्या काना कोपऱ्यात पोहोचण्यासाठी सर्व दुर्गसेवक, शिवप्रेमी, ट्रेकर्स, सामाजिक संस्था, मंडळ यांनी जनजागृती म्हणून आमच्या या उपक्रमा प्रमाणेच विविध प्रकारचे उपक्रम राबवून आपल्या या गडकिल्ल्यांना नामांकन कसे मिळेल यासाठी प्रयत्न करा असे आवाहन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग यांनी केले आहे.