शहापुरात तीन तिघाडा काम बिघाडा; मिंधे गट, भाजपच्या दाव्यामुळे दरोडांचे भवितव्य धोक्यात

विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना शहापूरमध्ये तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी अवस्था खोके सरकारची झाली आहे. या मतदारसंघात दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आहेत. हे वास्तव असतानाही मिंधे गट आणि भाजपने या मतदारसंघासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे दौलत दरोडा यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे.

शहापूर विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे दौलत दरोडा विद्यमान आमदार आहेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आल्यानंतर शहापूरच्या भाजप पदाधिकाऱ्यांनी दरोडा यांच्या विरोधात सूर आळवले आहेत. आमदार दरोडा यांची गेल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीची वाटचाल पाहून त्यांना शहापूर विधानसभेत परिस्थिती अनुकूल नसल्याचा आरोप करून या विधानसभा क्षेत्रामध्ये उमेदवारीसाठी नवीन चेहऱ्याची मागणी भाजपकडून अनुसूचित जमातीसाठी राखीव केली जात आहे.

अजित पवार गटाचे मताधिक्य घटले
दरोडा यांनी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही प्रकारे भाजपला मदत केलेली नाही. राष्ट्रवादी पक्षाचे दोन भाग झाल्यामुळे अजित पवार गटाकडे मतदारसुद्धा राहिलेले नाहीत. अजित पवार गटाकडे शहापूर विधानसभा क्षेत्रात अवघे बारा ते चौदा हजार इतकेच मतदार आहेत असा आरोप भाजपने केला आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत या आमदारांनी भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्याला मदत केली नसून भाजपचे कार्यकर्तेदेखील कोणत्याही परिस्थितीत अजित पवार गटाला मदत करणार नाहीत, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे दरोडा यांच्या अडचणी वाढल्या आहेत.