निवडणूक आयोगाचा खेळ आकड्यांचा; आधीच्या यादीत आणखी 26 हजार नावे घुसडली

प्रातिनिधिक फोटो

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा आकड्यांचा खेळ पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात दुबार मतदार घटण्याऐवजी वाढवल्याचे निदर्शनास आले असून आधीच्या यादीत 26 हजार 392 नावे घुसडली आहेत. त्यामुळे दुबार मतदारांची एकूण संख्या सध्या 1 लाख 93 हजार 302 एवढी झाली आहे. मतदार याद्यांमध्येच घोळ असेल तर निवडणुका निपक्षपणे कशा घेणार, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. ही नावे लवकरात लवकर वगळली नाही तर कोर्टात दाद मागण्याचा इशारा शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे यांनी दिला आहे.

ठाणे लोकसभा क्षेत्रातील मौरा भाईंदर, ओबळा-माजिवडा, कोपरी पाचपाखाडी, ठाणे, ऐरोली, बेलापूर या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये १ लाख ६६ हजार ९१० दुबार मतदार असल्याचे पुरावेच राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून दिले होते. यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात आली. त्यात जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना मतदारांची दुबार नावे असलेली प्रिंट व पूर्वी सॉफ्ट कॉपीदेखील दिली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही सर्व नावे वगळण्याचे आदेश दिले. त्यामुळे कार्यवाही केली जाईल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात कोणतीही हालचाल झाली नाही.

तर आंदोलन करणार
निवडणूक आयोगाच्या मोंगळ कारभारावर तसेच प्रशासकीय यंत्रणेवर राजन विचारे यांनी ताशेरे ओढले. त्वरित दुबार नावे वगळा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करू व कोर्टातही दाद मागू, असा थेट इशारा देण्यात आला आहे. यावेळी ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, नवी मुंबई जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, ओवळा-माजिवडा विधानसभा संपर्कप्रमुख नरेश मणेरा, उपशहरप्रमुख भास्कर वैरीशेट्टी, सुरेश मोहिते, संजय दळवी, प्रतीक राणे, अमोल हिंगे, विश्वास निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

३० ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली तेव्हा धक्काच बसला. दुबार मतदारांची संख्या कमी होण्याऐवजी ती १ लाख ९३ हजार ३०२ एवढी असल्याचे दिसून आले. याचा अर्थ २६ हजार ३९२ एवढी नावे वाढली. दुबार नावे वगळण्याचे आश्वासन देऊनही निवडणूक आयोगाने कोणतीही कार्यवाही केली नाही. आकड्यांचा खेळ व आयोगाचा अजब कारभार उघड होताच शिवसेना नेते राजन विचारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन तीव्र नाराजी व्यक्त केली.