बेस्टच्या वाहक-चालकांना संरक्षण द्या, वडाळा आगारात कामगारांची निदर्शने

धारावीच्या पिवळा बंगला परिसरात गुरुवारी रात्री गर्दुल्ल्याने धावत्या बसमध्ये ‘बेस्ट’च्या वाहकावर चाकूने सपासप वार करून जबर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर वडाळा आगारातील कामगारांनी सोमवारी तीव्र निषेध करीत पुन्हा असे हल्ले होऊ नयेत म्हणून बेस्टच्या चालक-वाहकांना संरक्षण देण्याची मागणी बेस्ट महाव्यवस्थापकांकडे केली.

सध्या कर्तव्यावर असणाऱ्या बेस्ट कर्मचाऱ्यांवर अज्ञात व्यक्तींकडून हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन करून कामगारांचे संरक्षण करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा, अशी मागणी या वेळी कामगारांनी केली. तसेच हल्लात जखमी झालेल्या बस वाहक अशोक डागळे यांचा सर्व वैद्यकीय खर्च प्रशासनाने करावा. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर पोलिसात गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली.