पश्चिम रेल्वेवर आज, उद्या साडेसहा तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव आणि कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामानिमित्त मंगळवारी आणि बुधवारी रात्री 11 ते पहाटे 5.30 या दरम्यान साडेसहा तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11.30 ते रात्री 3.30 वाजेपर्यंत सर्व अप जलद मार्गावरील लोकल बोरिवली ते अंधेरी स्थानकादरम्यान अप धीम्या मार्गावरून धावतील. तसेच रात्री 11 ते पहाटे 5.30 वाजेपर्यंत सर्व अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस अंधेरी ते बोरिवली दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर धावतील. या ब्लॉकमुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून अनेक लोकल रद्द करण्यात येतील. तर काही शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहेत.