आम्ही 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युनोच्या महासभेत दावा

हिंदुस्थानातील 25 कोटी लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढले आहे आणि या यशाचा अनुभव आम्ही सर्वांशी शेअर करू शकतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत विविध समस्यांशी झुंजणाऱ्या राष्ट्रांसाठी सहकार्याचा हात पुढे केला.

‘समिट ऑफ फ्युचर’ परिषदेत बोलताना मोदी यांनी युद्ध, दहशतवाद, शांतता, सायबर वॉर, समुद्र आणि अवकाश यासह अनेक मुद्दय़ांकडे जगाचे लक्ष वेधले. मानवतेचे यश रणांगणात नव्हे, तर सामूहिक शक्तीमध्ये आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

सुरक्षा परिषदेसाठी केला दावा

सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठीही मोदी यांनी अप्रत्यक्षपणे दावा केला. जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक असून जी 20 शिखर परिषदेने आफ्रिकन युनियनला दिलेल्या कायमस्वरूपी सदस्यत्वाकडे त्यांनी महासभेचे लक्ष वेधले.