हिंदुस्थानचा दस का दम; बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये 10 खेळाडूंमुळे मिळाले सोनेरी यश

हिंदुस्थानने बुडापेस्ट (हंगेरी) येथे पार पडलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पुरुष महिला गटांत सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडविला. वैयक्तिक गटातही हिंदुस्थानी खेळाडूंनी चार सुवर्णपदके जिंकली. पुरुष महिला गटांत दोनदोन खेळाडूंनी अक्वल क्रमांक मिळविला. दोन्ही गटांत पाचपाच बुद्धिबळपटूंनी कौशल्य पणाला लावत हिंदुस्थानचा दस का दमदाखविला. 11 फेऱयांच्या या स्पर्धेत हिंदुस्थानच्या खुल्या संघाने 22पैकी 21 गुणांची कमाई करीत निर्विवाद वर्चस्व गाजविले, तर महिला संघाने 19 गुण मिळवीत बाजी मारली.

वंतिका, दिव्या यांना सुवर्ण

महिला संघाला तानिया सचदेव, वैशाली रमेशबाबू, हरिका द्रोणावल्ली, वंतिका अग्रवाल व दिव्या देशमुख यांनी सुवर्णपदक जिंकून दिले. यात वंतिका रमेशबाबू व दिव्या देशमुख यांनी वैयक्तिक सुवर्णपदकेही जिंकली. तानियाने पाच लढती खेळल्या. यात तिने दोन लढती जिंकल्या, तर तीन ड्रॉ केल्या. मात्र, तिने एकही पराभव पत्करला नाही. हरिका द्रोणावल्ली हिने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये नऊ लढती खेळल्या. यात तिने तीन जिंकल्या, तीन ड्रॉ केल्या, तर तीन लढती गमावल्या. वैशाली रमेशबाबू हिने 10 लढती खेळल्या. यात तिने चार लढती जिंकल्या, दोन गमावल्या, तर चार लढती बरोबरीत सोडविल्या. वंतिका अग्रवाल हिने 11पैकी नऊ लढती खेळल्या. त्यांत केवळ एक लढत गमावली. तिने पाच लढती जिंकल्या, तर तीन बरोबरीत सोडविल्या. दिव्या देशमुखने सर्व 11 लढती खेळल्या. त्यात तिने आठ विजय मिळविले, तर तीन लढती बरोबरीत सोडविल्या.

गुकेश, अर्जुन यांना सुवर्ण

खुल्या गटात पेंटाला हरिकृष्णा, आर. प्रज्ञानंद, विदित गुजराती, डी. गुकेश व अर्जुन इरिगॅसी यांनी हिंदुस्थानी संघाला सुवर्णपदक जिंकून दिले. यात गुकेश आणि अर्जुन यांनी अक्वल कामगिरी करीत वैयक्तिक सुवर्णपदकेही जिंकली. हिंदुस्थानी संघ 11 फेऱयांमध्ये अजिंक्य राहिला. यात हिंदुस्थानी संघाने 10 फेऱया जिंकल्या, तर केवळ उझबेकिस्तानविरुद्ध बरोबरी साधली. 11 फेऱयांतील 44 लढतींत हिंदुस्थानने केवळ अमेरिकेविरुद्ध एक लढत गमावली. संघातील सर्वांत अनुभवी खेळाडू पेंटाला हरिपृष्णाने तीन लढती खेळल्या. त्यात त्याने दोन लढती जिंकल्या, तर एक ड्रॉ केली. युवा खेळाडू रमेशबाबू प्रज्ञानंदने 10पैकी तीन लढती जिंकल्या, तर सहा बरोबरीत सोडविल्या. विदित गुजरातीने 10 लढती खेळल्या. पैकी पाच जिंकल्या, तर पाच बरोबरीत सोडविल्या. गुकेश डोम्माराजू याने 10पैकी आठ लढती जिंकल्या, तर दोन बरोबरीत सोडविल्या. त्याने 10व्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना यालाही पराभवाचा धक्का दिला. अर्जुन इरिगॅसी याने 11 लढती खेळताना नऊ लढती जिंकल्या, तर दोन लढतींत बरोबरी मान्य केली.