लेख : मराठी भाषा विद्यापीठ – गरज आणि उपयुक्तता

>> योगेंद्र ठाकूर

मराठी भाषा विद्यापीठाची पहिली वीट रचली गेली आहे. या विद्यापीठात शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा रोजगाराच्या दृष्टीने कसा तयार होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. मराठी भाषा विद्यापीठाची गरज व उपयुक्तता लक्षात घेऊन आणि दक्षिणेतील भाषा विद्यापीठांची कार्यपद्धती, अभ्यासक्रम आदींचा अभ्यास करून मराठी भाषा विद्यापीठाच्या कार्याचा आराखडा करण्याची जबाबदारी डॉ. अवलगावकर यांच्यावर असणार आहे.

मराठी भाषेचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. अविनाश आवलगावकर यांची रिद्धपूर (अमरावती) येथे उभारण्यात येणाऱया मराठी भाषा विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू म्हणून महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकतीच नेमणूक केली आहे. बरीच वर्षे बासनात गुंडाळून ठेवण्यात आलेले मराठी भाषा विद्यापीठ लवकर पूर्णत्वास जावे म्हणून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने नोव्हेंबर 2021 मध्ये पावले उचलली. पुढे डिसेंबर 2023 मध्ये डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली गेली. त्या समितीत डॉ. अविनाश आवलगावकर यांचा समावेश होता.

महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये मराठी भाषेचे विभाग त्या-त्या विद्यापीठांच्या स्थापनेपासून आहेत, पण स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ नव्हते. दक्षिणेकडील राज्यांत त्यांच्या भाषेची विद्यापीठे आहेत. त्यांच्या कारभारावर नजर टाकली तरी भाषा विद्यापीठाची गरज व उपयुक्तता लक्षात येते. प्रादेशिक अस्मिता आणि भाषा जपण्यासाठी सदैव तत्पर असणाऱया दक्षिणेकडील राज्यांनी त्यांच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून तर दिलाच आणि भाषा विद्यापीठेदेखील स्थापन केली. आपल्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षिणेकडील सरकारांनी -मग ती कुठल्याही पक्षाची असली तरी- त्यांचे भाषेवरचे प्रेम कमी होत नाही. त्यांची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ होती म्हणूनच तिथे भाषा विद्यापीठे स्थापन झाली. तामीळ भाषा विद्यापीठ (1981), तेलुगू भाषा विद्यापीठ (1985), कन्नड भाषा विद्यापीठ (1991), तर मल्ल्याळम भाषा विद्यापीठ (2012) स्थापन झाले. तामीळ भाषा विद्यापीठ तंजावर येथे स्थापन झाले असून त्या विद्यापीठात कला, पांडुलिपी, विज्ञान, तामीळ विकास भाषा, सामाजिक शास्त्र असे सहा विभाग आहेत. त्यात उद्योग, भूगर्भशास्त्र, स्थापत्य शास्त्र, संगणक शास्त्र आणि पर्यावरण असे पोटविभाग आहेत. तामीळ भाषा विद्यापीठ स्थापण्याचा प्रयत्न 1925 पासून केला गेला. स्वातंत्र्यानंतर तामीळनाडू सरकारने विधिमंडळात कायदा पास केला आणि 1981 पासून तामीळ भाषा विद्यापीठ सुरू झाले. तेलुगू भाषा विद्यापीठ 1985 साली हैदराबाद येथे स्थापन झाले असून एकूण 52 ज्ञान-विज्ञानविषयक अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. कर्नाटक सरकारने 1991 साली हंपी येथे कन्नड भाषा विद्यापीठाची स्थापना केली, तर 2012 साली केरळ सरकारने मल्याळम भाषा विद्यापीठ हे तिरूर येथे स्थापन केले. या विद्यापीठाचे विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र आदींचे पदव्युत्तर शिक्षण मल्याळी भाषेमध्ये देण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल सुरू ठेवली आहे. दक्षिणेकडील राज्यांत सर्वत्र इंग्रजीतून शिक्षण घेण्याचा कल दिसत असला तरी इंग्रजीबरोबर राज्यांच्या भाषेत सर्व शाखांचे शिक्षण देण्यासाठी ही विद्यापीठे स्थापन झाली आहेत. या सर्व विद्यापीठांना राजकीय व आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे आज ती विद्यापीठे विकसित झाली आहेत. भाषिक अस्मितेची जोड लाभल्यामुळे आज ही राज्ये सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. आपल्या महाराष्ट्रातही हे होऊ शकते.

तसे पाहिले तर मराठी भाषा विद्यापीठाची मागणी जुनीच आहे. मराठी भाषा विद्यापीठाच्या मागणीची चर्चा 1933 साली नागपूर येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात प्रथम झाली. नंतर 1939 साली नगर येथे संपन्न झालेल्या साहित्य संमेलनात, संमेलनाध्यक्ष महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांनी मराठी भाषा विद्यापीठासाठी आग्रह धरला. ते म्हणतात, “आजची विद्यापीठे असावी तितकी प्रागतिक नाहीत, तर ती केवळ परीक्षा पीठे झाली आहेत. त्यासाठी मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना अत्यावश्यक आहे.’’ त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. नंतर पुण्यात महाराष्ट्र विद्यापीठ सुरू झाले, परंतु मराठी भाषा विद्यापीठासाठी प्रयत्न सुरूच राहिले. मराठी भाषा विद्यापीठ रिद्धपूर (जि. अमरावती) येथे होण्याची मागणी जेव्हा करण्यात आली तेव्हा काही लोकांनी अंबाजोगाई, नेवासा येथे हे मराठी विद्यापीठ व्हावे यासाठी प्रयत्न सुरू केले. चक्रधर स्वामींच्या रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ होण्यासाठी साहित्यिकांनी पाठिंबा दिला. आधीच्या सरकारने तसा प्रयत्न केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी चक्रधर स्वामींच्या नावे रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापण्याचा शासनाचा विचार आहे असे सांगितले, परंतु हालचाल झाली नाही आणि मराठी भाषा विद्यापीठाचा प्रश्न पुन्हा बासनात गुंडाळण्यात आला. नंतर महाविकास आघाडी सरकारने मार्च 2021 साली मराठी भाषा विद्यापीठ स्थापण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही देऊन कामास चालना दिली. मराठी भाषा विद्यापीठाची पहिली वीट आता रचली गेली आहे. लवकरच विद्यापीठ संपूर्ण ताकदीनिशी कार्यान्वित होईल. मराठी भाषा विद्यापीठातील विद्यार्थ्याला वैविध्यपूर्ण आणि बहुभाषिक शिक्षण कसे मिळेल आणि या विद्यापीठात शिक्षण घेतलेला विद्यार्थी हा रोजगाराच्या दृष्टीने कसा तयार होईल याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. मराठी भाषा विद्यापीठाची गरज व उपयुक्तता लक्षात घेऊन आणि दक्षिणेतील भाषा विद्यापीठांची कार्यपद्धती, अभ्यासक्रम आदींचा अभ्यास करून मराठी भाषा विद्यापीठाच्या कार्याचा आराखडा करण्याची जबाबदारी डॉ. अवलगावकर यांच्यावर असणार आहे.

मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेनंतर विज्ञान, तंत्रज्ञान, आयुर्विज्ञान, अभियांत्रिकी आदी विषय शिकण्याचा पर्याय, ज्या युवकांना इंग्रजीमधून शिकायचे नाही, त्यांच्यापुढे येऊ शकतो. पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण व संशोधन यांना चालना मिळू शकते. देशातील व परदेशातील साहित्याचे अनुवाद करून त्यांच्या भाषांमधील दर्जेदार साहित्याचा अनुभव घेता येईल. तसेच मराठीतील साहित्य इतर भाषांमध्ये अनुवाद करून ते जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी अधिक सुलभ होईल. अनुवादाच्या माध्यमातून जागतिक भाषांमधील अधिकाधिक साहित्य, विज्ञान-ज्ञान मराठीत आणता येईल. लोककला, लोकसाहित्य, बोलीभाषांचा अभ्यास, प्राचीन ज्ञानाचे संशोधन आदी उपक्रम राबविण्यास, मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. ज्या मराठी तरुणांना इंग्रजीतून शिक्षण घेण्याची संधी आर्थिक किंवा सामाजिक अडचणींमुळे मिळू शकली नाही, त्यांना आपल्या मायमराठीतून शिक्षण मिळू शकेल. सरकारचे अनेक महत्त्वाचे अनुवादाचे उपक्रम आहेत. अभ्यासू अनुवादकांची सध्या मागणी आहे. जागतिक पातळीवर आपले मराठी साहित्य पोहोचवण्यासाठी अशा अनुवादकांची गरज भासते. म्हणून मराठी भाषा विद्यापीठाची गरज आणि उपयुक्तता अधोरेखित होते.

(लेखक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे माजी सदस्य आहेत.)