Nanded News – मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, पाच जण जखमी

सरसकट मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी मराठा समाज शांततेने आंदोलन करत असताना आज सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची व पोलिसांची शाब्दीक बाचाबाची झाली. त्यानंतर भाग्यनगर पोलिसांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर बेछूट लाठीमार केला. यात पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहेत. समाजाच्या न्याय मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात व मराठा समाजाला न्याय द्यावा या मागणीसाठी सकल मराठा समाजाने तीन दिवसापूर्वी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. तसेच आज दि.23 रोजी नांदेड बंदचे आयोजन करण्यात आल्याचे रितसर सांगितले होते. त्यानुसार आज शहरातील सर्व व्यापारपेठा, शाळा, महाविद्यालय, बससेवा पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या. नांदेड शहरात व जिल्ह्यातील एका आगारातून सायंकाळी पाच वाजेपर्यंत एकही बस सुटली नाही. बसस्थानकावर शुकशुकाट होता.

सकाळी 11 वाजता मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅली काढून व्यापार्‍यांना हात जोडून आपली प्रतिष्ठाणे बंद करण्याचे आवाहन केले. छत्रपती चौकातून हि रॅली मोर चौकात आली असताना मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी काही दुकानदारांना दुकानात जाऊन आजच्या बंदमध्ये सहभागी होण्याची विनंती केली. त्यानंतर मोर चौकात घोषणाबाजी सुरू केली. त्याचवेळी भाग्यनगर पोलिसांचे पथक त्याठिकाणी आले. यावेळी त्यांची व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची झाली. यावेळी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांनी गाडीतील लाठ्याकाठ्या काढून मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केला. यात पाच जण जखमी झाले आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक व मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाचीही झाली. त्यानंतरही लाठीमार सुरुच होता. पोलिसांनी केलेल्या बेदम मारहाणीत पाच जण जखमी झाले असून, त्यापैकी दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेऊन बंद शांततेत असताना पोलिसांनी अचानकपणे दहशत माजवत कार्यकर्त्यांना मारहाण केली. या सर्व प्रकरणाचा आपण निषेध करत असून संबंधितांवर कडक कारवाई करुन त्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.