आमचं सरकार आल्यावर मुंबई-गोवा महामार्गाची चौकशी लावू; शरद पवार यांचे प्रतिपादन

मुंबई-गोवा महामार्गावरील रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. दोन महिन्यानंतर आमचे सरकार आल्यानंतर आम्ही रस्त्याच्या कामांची चौकशी लावू आणि जनतेला चांगले रस्ते देऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

चिपळूण येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी कराडवरून चिपळूणला येताना आलेला खराब रस्त्याचा अनुभव सांगितला. ते म्हणाले की, मी काल कराड मार्गे चिपळूणला आलो अतिशय खराब रस्त्याचा अनुभव घेतला. रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाची अवस्थाही तीच आहे. हा सरकारचा बेफिकिरपणा आहे. चिपळूण येथे कोसळलेल्या ओवरब्रिजचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. पुण्यात काही दिवसांपूर्वी ट्रक खड्ड्यात गेल्याचे उदाहरण देताना शरद पवार यांनी रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला.

महाविकास आघाडीचे जागावाटप लवकर होईल पण त्यापूर्वी अन्य काही पक्षांना महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याचा माझा विचार आहे. कम्युनिस्टपक्ष, शेकाप सारख्या पक्षांना महाविकास आघाडीत घेण्याचा विचार सुरू आहे, असे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात एक चांगला प्रगतशील पर्याय उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रात चांगले सरकार आम्ही देऊ. जागावाटप केल्यानंतरच उमेदवार जाहिर केला जाईल. चिपळूणची जागा आम्हाला मिळाल्यास आम्ही आमचा उमेदवार जाहिर करू, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

लाडक्या बहिणी वरून सुरू असलेल्या श्रेयवादावर शरद पवार म्हणाले की, योजना ही सरकारच्या पैशातून असते, कोण खिशातून पैसे देत नाही. मी 24 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात होतो. पण आम्ही कधी असे केले नाही. महाशक्ती या तिसऱ्या आघाडी बाबत शरद पवार म्हणाले की, लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. यावेळी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी आमदार रमेश कदम, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, सरचिटणीस प्रशांत यादव उपस्थित होते.