छत्रपती संभाजीराजेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; प्रकृतीची केली विचारपूस

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. जरांगे यांची प्रकृती उपोषणादरम्यान खालावली आहे. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी छत्रपती संभाजीराजे यांनी सोमवारी जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जरांगे यांना वर्षभरात सहाव्यांदा उपोषण करावे लागत आहे, ही राज्यासाठी शरमेची बाब असल्याचे छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावत उपोषणाला बसला आहे. तरीही याबाबत सरकारने निर्णय घेतलेला नाही. आपण डॉक्टर्सकडून जरांगे यांचे सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी व प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. सरकारने आरक्षणाबाबत आश्वासन दिलं होतं, गुलाल लावून घेतला होता. मात्र, त्यानंतर सरकारने यावर भाष्य केले नाही. सरकारने याबाबत बोलण्याची गरज आहे, तर आरक्षण कसं देणार, याबाबत विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी,असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.

जरांगे यांची प्रकृती महत्त्वाची असून मी त्यांना बघायला आलोय. त्यांची प्रकृती बघून आपल्याला दु:ख होत आहे. त्यांची तब्येत खालावली आहे. तसेच त्यांनी आता सलाईन घ्यायचं बंद केलं आहे. जरांगे यांची अशी परिस्थिती असताना सरकार मुंबईत एअर कंडिन्शन्स ऑफिसात बसले आहेत, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला. विरोधी पक्षातील नेतेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे चालणार नाही. हे तुमचं कॅबिनेट आहे ना घ्याना निर्णय मग. हो की नाही बोलून टाका. ही काय पद्धत आहे. इथले मेडिकल रिपोर्ट जातात तिकडे. मेडिकल रिपोर्ट वाईट आहेत. काही होऊ शकतं. त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात, असा इशाराही छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.