बलात्कार प्रकरणातील आरोपीला भाजप नेत्याची मदत? गृहमंत्र्यांसोबतचा फोटो झाला व्हायरल, लोकांमध्ये संताप

सध्या देशभरात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असल्याचं समोर येत आहे. अशातच भाजपच्याच एका नेत्यानं बलात्कार प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी लपण्यास मदत केली आणि त्याच्या जेवणाची सोय करून दिल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. गुजरातमधील चाणसमा परिसरात अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणाने आता नवं वळण घेतलं आहे. मेहसाणा जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या नेत्याचा सहभाग समोर आला आहे. एवढेच नाही, तर आरोपीच्या चौकशीच्या आधारे भाजप युवा आघाडीचा नेता गौरव चौधरी यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

सुमारे 6 महिन्यांपूर्वी ​शंकर चौधरी या अपंग व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल केला. पीडितेच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मेहसाणा तालुक्यातील एका गावातून त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी या बलात्कार प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का? याचा तपास केला. सखोल चौकशी केल्यानंतर मेहसाणा जिल्हा भाजप युवा आघाडीचे मंत्री गौरव चौधरी याचं नाव पुढे आलं. या कारणावरून पोलिसांनी गौरव चौधरीला त्याच्या घरातून अटक केली.

या संपूर्ण घोटाळ्यात भाजप युवा आघाडीचा नेता गौरव चौधरी यानेच अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शंकर चौधरीला अज्ञातस्थळी लपवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एवढेच नाही तर आरोपीचा फोन लपवून गौरव चौधरीने आरोपी त्याच्या जेवणाची व्यवस्थाही केली होती असं उघड झालं आहे. पोलिसांनी दोघांचे मोबाईलही जप्त केले असून पुढील तपास सुरू आहे.

गुजरात समाचारने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे. दरम्यान, बलात्कारातील आरोपी आणि भाजप युवा मोर्चाचा नेता गौरव चौधरी आणि गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांचे फोटो चर्चेत आले आहेत. याआधीही सुरतमध्ये एक भाजप नेता आणि गृहमंत्र्यांसोबत एका ड्रग्ज व्यापाऱ्याचे फोटो व्हायरल झाले होते, तेव्हा या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले होते.